28.1 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeराष्ट्रीयउज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग

उज्जैन : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग उज्जैन महाकालेश्वर मंदिराच्या गेट क्रमांक १ वर भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे मंदिर परिसरात उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या.

मंदिर परिसरातील आग विझवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले गेले. सध्या ही आग नियंत्रणात आली असल्याची माहिती समोर येत आहे. या आगीची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि एसपी यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्या या प्रकरणाचा तपास पोलिस करत असून, यानंतरच आगीचे नेमके कारण समोर येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास महाकालेश्वर मंदिराच्या फॅसिलिटी सेंटरवर असलेल्या प्रदूषण मंडळाच्या नियंत्रण कक्षात अचानक आग लागली. या आगीने प्रचंड स्वरूप घेताच परिसरात धुराचे लोट दिसू लागले. यामुळे मंदिर परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती तातडीने पोलिस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. या आगीमुळे मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात देखील खळबळ उडाली होती. अथक प्रयत्नांनंतर अखेर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले.

गेट क्रमांक १ तूर्तास बंद
दररोज हजारो भाविक बाबा महाकालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी उज्जैनच्या मंदिरात हजेरी लावत असतात. या आगीच्या घटनेनंतर मंदिरात चांगलाच गदारोळ माजला होता. सुरक्षेचा विचार करता मंदिर प्रशासनाने गेट क्रमांक १ तूर्तास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या मंदिराच्या या प्रवेशद्वारातून भाविकांना आत जाता येणार नाही. या घटनेत कोणतीही जीवितहानी घडली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, आगीमुळे मंदिराच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR