29.1 C
Latur
Monday, May 5, 2025
Homeमहाराष्ट्रबीडमध्ये पाणी संकट !

बीडमध्ये पाणी संकट !

अजित पवारांच्या फोटोला घातले अभ्यंगस्रान!

बीड : प्रतिनिधी
तब्बल ३२ दिवसापासून बीडकरांच्या नळाला पाणी नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारख्या डॅशिंग नेत्याने जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्यांनतर तरी या पाणीबाणीतून बीडकरांची सुटका होत नसल्याने नागरिकांनी बीडचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोला अभ्यंस्रान घालत निषेध व्यक्त केला.

शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली, थकलेल्या वीज बीलामुळे ऐन उन्हाळ्यात पुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यात महिना उलटून गेला तरी पाणीपुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री अन् प्रशासनाच्या नावाने शिमगा सुरू झाला आहे.

यामुळे संतापलेल्या नागरिकांनी ५ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या प्रतिमेला अभ्यंग स्रान घातल निषेध व्यक्त केला. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आंदोलकांची समजूत काढण्यासाठी दाखल झाले. यापुढे आठ दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचा दावा करत त्यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. जुन्या गंजलेल्या जलवाहिनीचे पाईप बदलण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. तिथेही संदीप क्षीरसागर यांनी भेट दिली.

अमृत अटल योजना कुठे गेली?
माजलगाव धरणातून बीड शहराला पाणीपुरवठा होतो. मात्र काडी वडगाव परिसरातील मुख्य जलवाहिनीचा चौदाशे मीटर भाग गंजला आहे. त्यामुळे गेल्या ३२ दिवसापासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित झाला आहे. ११४ कोटी रुपयांची अमृत अटल योजना कुठे गेली? असा सवाल करत लोक रस्त्यावर उतरले आहेत. बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी बीडकरांच्या व्यथा जाणून घेऊन पाणी प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी आंदोलनकर्त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. तसेच अजित पवार यांच्या प्रतिमेला अभ्यंग स्रान घालून संताप व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR