नवी दिल्ली : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे. आता हे सर्व खोटे एकेक करून पकडले जात आहेत. पाकिस्तानने म्हटले आहे की त्यांनी भारताचे १ राफेल आणि २ मिग विमान पाडले आहेत. सोशल मीडियावर पाकिस्तान समर्थित वापरकर्त्यांनी फेक बातम्या पसरविणे सुरू केले आहे.
हवाई हल्ल्यानंतर, पाकिस्तानी वापरकर्त्यांनी सोशल मीडियावर ९ महिन्यांचा जुना व्हीडीओ शेअर केला. याद्वारे असा दावा करण्यात आला की पाकिस्तानने भारताचे एक राफेल पाडले. तथापि, सत्य हे आहे की हा व्हीडीओ ३ डिसेंबर २०२४ चा आहे, जेव्हा भारतीय हवाई दलाचे मिग-२९ लढाऊ विमान राजस्थानमध्ये कोसळले होते. तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.
२ मिग विमाने पाडल्याचा खोटा दावा
सोशल मीडियावर एक व्हीडीओ शेअर केला जात आहे ज्यामध्ये पाकिस्तानने भटिंडा आणि अखनूरमध्ये दोन मिग विमाने पाडल्याचा दावा केला जात आहे. पण शेअर केला जाणारा व्हिडिओ २१ मे २०२१ चा असल्याचे निष्पन्न झाले. चार वर्षांपूर्वी पंजाबमधील मोगा जिल्ह्यात एक मिग-२१ लढाऊ विमान कोसळले होते. यामध्ये एका पायलटचाही मृत्यू झाला. हाच व्हिडिओ आता हवाई हल्ल्यानंतरचा असल्याचे म्हटले जात आहे. सदर व्हीडीओ बनावट असल्याचे आढळून आले.