नागपूर : प्रतिनिधी
भाजपप्रमाणेच महायुतीतील एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्षवाढ व आगामी निवडणुकांसाठी जोमाने तयारीला लागली आहे. चांदा ते बांदा पक्षात प्रवेश करून घेतले जात आहेत. नागपुरातही दोन दिवसांपूर्वी वाजतगाजत माजी नगरसेवकांचे प्रवेश करून घेतले गेले. यातील काहींनी ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेत पक्षप्रवेश फेटाळला आहे.
यावरून शिवसेनेचे नेतृत्व तोंडघशी पडत आहे. तर, पक्षातील एक अतिउत्साही माजी नगरसेवक असलेला पदाधिकारी राज्यमंत्र्यांना हाताशी धरून असे प्रवेश करून घेत असल्याची नाराजीही वाढली आहे.
पक्षात प्रवेश होत असताना संपर्कप्रमुख, शहरप्रमुखांना टाळले जात आहे. गुपचूप प्रवेश करवून घेतले जात असल्याबद्दलही पदाधिका-यांमध्ये संताप वाढत आहे. राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वात एक-दोन नव्हे तर तब्बल १६ माजी नगरसेवकांचे प्रवेश करून घेतले गेले. रामटेकसाठी आमदार कृपाल तुमाने यांच्याकडे संपर्कप्रमुखाची जबाबदारी आहे. नागपूर शहराचे संपर्क प्रमुख म्हणून माजी आमदार मनोहर चंद्रीकापुरे आहेत.
तसेच किरण पांडव हे पूर्व विदर्भाचे संघटक आहेत. एवढेच नव्हे तर सूरज गोजे हे शहर व जिल्हाप्रमुख आहेत. या नेत्यांनाही या प्रवेशाची कुठलीच सूचना नाही. काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री व पक्षनेते एकनाथ शिंदे नागपुरात आले होते.
प्रवेशासाठी खोटारडेपणा
वर्धा मार्गावरील एअरपोर्ट मेट्रोच्या सभागृहात पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांतून इतर पक्षाच्या पदाधिका-यांचे पक्षप्रवेश झाले. यातील अनेकांना अद्याप कुठलीही जबाबदारी दिली गेली नाही. मनसेचे उपाध्यक्ष किशोर सरायकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. यातील काही जण गैरहजर होते. मात्र, त्यांचे प्रवेश झाल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले. आता या माजी नगरसेवकांनी आम्ही प्रवेश घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. यावरून प्रवेशासाठी होत असलेला खोटारडेपणा पुढे आला आहे.
परसराम बोकडे, भास्कर बुरडे, जिजा धकाते, दुर्गा रेहपाडे, भीमराव नंदनवार या पाच माजी नगरसेवकांनी आमचा शिंदे सेनेत प्रवेश झाल्याचे वृत्तपत्रातील बातम्यांमधूनच कळल्याचे सांगितले आहे. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक व जिल्हाप्रमुख अशी जबाबदारी असल्याचा दावा करणारे बंडू तळवेकर यांनी पुढाकार घेतला होता. तळवेकर हे अनेकांच्या संपर्कात आहेत. पक्षप्रवेश करून घेण्यासाठी ते सातत्याने फोन करतात.