नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तराखंडमध्ये ३० एप्रिलपासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. चारधाम यात्रेसाठी देश आणि जगातून लाखो भाविक उत्तराखंडमध्ये उपस्थित आहेत. याचदरम्यान गंगोत्रीच्या आधी भागीरथी नदीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी (८ मे) उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. गंगोत्रीजवळ सात आसनी हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस आणि प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पथक बचावकार्य करत आहे. या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अहमदाबाद करेल.
तर दुसरीकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्यासाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना देव शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे मोठे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, मी या संदर्भात अधिका-यांशी सतत संपर्कात आहे आणि प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पोलिस, लष्कर दल, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी, टीम १०८ रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. तहसीलदार भटवाडी, बीडीओ भटवाडी व महसूलचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. गंगाणीच्या पुढे असलेल्या नाग मंदिराखाली भागीरथी नदीजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले आहे.