30.4 C
Latur
Thursday, May 8, 2025
Homeमहाराष्ट्रलग्नाच्या तिस-याच दिवशी कर्तव्यावर

लग्नाच्या तिस-याच दिवशी कर्तव्यावर

आईचे डोळे पाणावले, बायकोही भावूक

जळगाव : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सैन्य दलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे.

सन २०१७ मध्ये सैन्यात दाखल झालेल्या मनोज पाटील यांचा सोमवारी (५ मे) विवाह झाला. देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने त्यांना सैन्य दलाकडून त्वरेने बोलावणे आले आहे. त्यांनीही देशाच्या कर्तव्याला प्राधान्य देत तडक ८ मे रोजी सीमेवर जाण्यासाठी निर्णय घेतला असून आज ते रवाना झाले आहेत. मुलगा देशसेवेसाठी निघाला असताना आईच्या डोळ्यांत अश्रू आले, तर पत्नीही भावूक झाली होती.

लग्नाची मनोहर स्वप्ने, आयुष्यभराच्या जोडीदारासोबत फिरण्याचे नियोजन, भविष्याबाबतच्या कल्पना, या सर्व गोड क्षणांना तिलांजली देऊन सोमवारी लग्न झालेले मनोज ज्ञानेश्वर पाटील हे नंदीचे खेडगाव येथील सैनिक हळदीचा रंग अंगावर असतानाच कर्तव्य बजावण्यासाठी आज गुरुवारी सीमेवर रवाना झाले आहेत.

पाचोरा तालुक्यातील नाचणखेडे येथील रामचंद्र पाटील यांची कन्या यामिनी हिच्याशी खेडगाव नंदीचे येथील ज्ञानेश्वर लुभान पाटील यांचा मुलगा मनोजचे लग्न ठरले. लग्नासाठी सुटी घेऊन मनोज गावी आले होते, पाचोरा येथे लग्न समारंभ पार पडत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरेने बोलावणे आले. कुटुंबासोबत लग्नाचा आनंद साजरा होत असतानाच कर्तव्यावर जावे लागत असल्याने माझ्या मुलाचा मला अभिमान असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या वडिलांनी दिली आहे. देशापेक्षा मोठे काहीही नाही. या कठीण परिस्थितीत देशसेवेला सर्वोच्च प्राधान्य असल्याची प्रतिक्रिया मनोजच्या पत्नीने दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR