लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या वतीने लातूर तालुक्यातील बाभळगाव येथे चालवलेल्या मोफत शिलाई प्रशिक्षण केंद्राचा यशस्वी समारोप नुकताच झाला. या कार्यक्रमात तब्बल १३८ महिलांनी आपले ३ महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले, ज्याबद्दल त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ट्वेंटीवन अॅग्री लीच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख फाउंडेशनने हे प्रशिक्षण केंद्र चालवले. या केंद्रात महिलांना ३ महिन्यांचे व्यावसायिक शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले. शिलाईच्या विविध पद्धती, डिझाइनिंग आणि कटिंग यांसारख्या कौशल्यांचे सखोल ज्ञान महिलांना या प्रशिक्षणातून प्राप्त झाले. बाभळगावमधील महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी फाउंडेशनने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला.
विलासराव देशमुख फाउंडेशनच्या या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रामध्ये बाभळगावातील १३८ महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला. या महिलांना सेजल सूर्यवंशी आणि क्रांती उफाडे या कुशल प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले. ३ महिन्यांच्या कालावधीत या महिलांना शिलाई कामातील सर्व कला आणि विविध प्रकारच्या शिलाईचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या या महिलांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या समारंभाला विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे, बाभळगावचे उपसरपंच गोविंद देशमुख, अविनाश देशमुख, सदस्य गोपाळ थडकर, प्रशिक्षक सेजल सूर्यवंशी आणि क्रांती उफाडे, गजानन बोयणे आणि सर्व प्रशिक्षणार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.