मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात सध्या अधिकृतपणे ४० हजार स्कूल बसेस रस्त्यावर धावत असून दुसरीकडे सुमारे ५० ते ६० हजार बसेस अनधिकृतपणे धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची शाळेतून ने-आण करीत असल्याची तक्रार स्कूल बस चालक-मालक संघटनेच्या पदाधिका-यांनीच केली आहे. या पार्श्वभूमिवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देत लवकरच स्कूल बसेसच्या नियमावलीत सुधारणा करणार असल्याची माहिती देतानाच अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करणा-या बसेसवर कारवाई करण्याचे आदेश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे स्कूल बस असोसिएशन व पालक असोसिएशन यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीस परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्या वेळी मंत्री सरनाईक बोलत होते. स्कूल बसमधून शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखावह झाला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. परिवहन विभागानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला प्राधान्य दिले असून यासाठी स्कूल बसेसच्या नियमावलीत आवश्यक सुधारणा केल्या जातील. वाहनचालकांनी या नियमांचे काटेकोरपण पालन करावे, असा इशारा देतानाच नियमावलीत सुधारणा करताना वाहनचालक आणि पालक संघटनांच्या भावना आणि अडचणींचाही विचार केला जाईल. कोणावर अन्याय होणार नाही; पण नियमही शिथिल होणार नाहीत, असेही सरनाईक या वेळी म्हणाले.
…तर अधिका-यांवरही होणार कारवाई
अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची ने-आण करताना कारवाई केलेल्या स्कूल बसेसना पुढील ३ महिन्यांत दंडात्मक रक्कम भरून त्या बसेस अधिकृत करून घेण्याची संधी मंत्री सरनाईक यांनी बस मालकांना दिली आहे मात्र, ३ महिन्यांनंतर ज्या प्रादेशिक परिवहन विभागांमध्ये अशा प्रकारच्या अनधिकृत स्कूल बसेस आढळल्यास संबंधित प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अधिका-यांनाही कठोर कारवाईला समोर जावे लागणार असल्याचा इशारा सरनाईक यांनी या वेळी दिला.