परभणी : पाकिस्तान-भारत तणावाच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये ड्रोनसदृश उपकरणे एका रांगेत आकाशात उडत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. हे चित्र अनेक गावांमध्ये दिसून आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत.
भारत-पाकिस्तान तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ९ मे रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव काजळे, तांडा पिंपळगाव, येलदरी यासह ग्रामीण भागातील अनेक गावांत ड्रोनसदृश उपकरणे आकाशामध्ये दिसून आली. गावातील लोकांनी यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर वरिष्ठांना कळविले आहे. १७ ते १८ हे ड्रोन असावेत, असा गावक-यांचा अंदाज आहे. यामुळे गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिस व महसूल प्रशासनाला गावातील पोलिस पाटील व इतरांनी तातडीने कळविले. भीतीपोटी काही ठिकाणचे ग्रामस्थ एकत्रित जमले होते. प्रशासकीय पातळीवर नेमके ड्रोन कशाचे होते, याबाबत फारशी माहिती नसल्याने नागरिकांत संभ्रमावस्था दिसत होती.
होय मलाही फोन आले : तहसीलदार
यासंदर्भात तहसीलदार राजेश सरोदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला ग्रामीण भागातून अनेक गावांतून फोन आले आहेत. नेमके हे ड्रोन कशा पद्धतीचे होते किंवा इतर काही वस्तू होती का, याची खात्री करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. प्रशासन दक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
स्टारलिंक सॅटेलाईट असू शकतात : पोलिस अधीक्षक
नागरिकांनी आकाशात जे पाहिले ते नेमके काय आहे, हे सांगता येत नाही. मात्र स्टार लिंक सॅटेलाइट असू शकतात. घाबरण्याचे कारण नाही. माहिती घेत आहोत, असे पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी सांगितले.
फ्रांसमध्येही दिसले होते सॅटेलाईट
फ्रांस व स्पेनमध्येही अशाप्रकारचे स्टारलिंक सॅटेलाईट दिसले होते. ते एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीचे आहेत. जिंतूर व सेलू तालुक्यात तसेच चित्र दिसले. हे स्टारलिंक सॅटेलाईट पृथ्वीभोवती फिरतात. त्यामुळे हे स्टारलिंक सॅटेलाईट असण्याची शक्यता नाकारता येत नाही.