पुणे : भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाले आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. भारताच्या सीमेवर पाकिस्तानी सैन्य कुरघोड्या करतच आहे, त्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर बारामती येथे शरद पवार पत्रकारांशी बोलताना सध्या सुरू असलेल्या भारत पाकिस्तान युद्धावर भाष्य केले असून भारत-पाकिस्तान तणावावर आंतरराष्ट्रीय पातळीवर होणा-या अपीलबद्दल शरद पवारांना विचारण्यात आले. त्यावर बोलायचे नसते तर डायरेक्ट अॅक्शन घ्यायची असते असे म्हटले आहे. तसेच शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या या धाडसी निर्णयाचे कौतुकही केले आहे. या कठीण काळात केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही देखील त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
ऑपरेशन ‘सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि संरक्षणमंत्री यांच्याशी संवाद साधला. भारतीय सशस्त्र दलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांनी केलेल्या कारवाईसाठी त्यांचे अभिनंदनही केले. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली असे ट्विट शरद पवारांनी केले होते.
पाकिस्तानच्या शनिवारी रात्री हल्ल्यानंतर भारताने त्यांच्या चार हवाई तळांवर हल्ला केला. वृत्तसंस्था एएनआय सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. सीमा सुरक्षा दलाने शनिवारी एक व्हिडिओ जारी केला. त्यात पाकिस्तानातील सियालकोटमधील दहशतवादी लाँचपॅडचे फुटेज आहे, जे बीएसएफने उद्ध्वस्त केले होते.
येथून ड्रोन डागले जात होते. शुक्रवारी संध्याकाळी ७.४७ ते १०.५७ दरम्यान पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील २६ शहरांमध्ये ५५० हून अधिक ड्रोन डागले. हा हल्ला सैन्याने हाणून पाडला. शनिवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातवर हल्ला केला. राजौरी, पूंछ आणि जम्मूमध्येही जोरदार गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात राजौरीच्या एका प्रशासकीय अधिका-यासह पाच जणांचा मृत्यू झाला.