कराची : वृत्तसंस्था
भारत आणि पाकिस्तानमध्ये गेल्या चौथ्या दिवशी सुद्धा तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देश मिसाईल आणि ड्रोनने एकमेकांचे लक्ष्य भेदण्याचा प्रयत्न करत आहे. पहलगाम हल्ल्यानंतर पाकड्यांची हेकडी काढली. पाकिस्तानात घुसून ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर पाकची आगळीक सुरूच आहे. युद्धाची खुमखुमी असलेल्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची जनतेची इच्छा आहे.
भारतीय लष्कराने दहशतवादी तळ अचूक हेरून त्यावर हल्ले चढवले होते. भारताच्या दणक्याने पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या गेल्या आहेत. दहशतवादी पोसणारा पाकिस्तान युद्धाची वल्गना करत होता. पण तीनच दिवसात पाकिस्तानची भाषा बदलली आहे. पाकचे उप पंतप्रधान इशाक डार यांनी म्हटले की, आम्ही भारताला प्रत्युत्तर दिले कारण आमचा संयम संपला होता. पण भारत जर आता थांबला तर आम्ही सुद्धा हे सर्व थांबवण्याचा विचार करू’. पाकिस्तानचे सूर बदलल्याचा हा पुरावा आहे. गेल्या दोन दिवसांपासून भारत-पाकिस्तानमध्ये महाशक्तीने दखल द्यावी यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत असल्याच्या दाव्याला हा एक प्रकारे दुजोराच आहे.
विशेष म्हणजे भारताने थांबावे आणि पाकिस्तान पण माघारी फिरेल असे डार यांनी स्पष्ट केले. त्यांनी याविषयीचा निरोप अमेरिकेला सुद्धा दिल्याची माहिती एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत दिली. अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलताना त्यांनी पाकिस्तानची ही भूमिका त्यांच्यासमोर मांडली. रूबियो यांनी अगोदर भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी संवाद साधला आणि नंतर डार यांच्याशी हॉटलाईनवर चर्चा केली. अमेरिकेने आवाहन केल्यानंतर पाकचा सूर बदलल्याची बोलले जात असले तरी भारताच्या जोरदार प्रत्युतरामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे.
दोन्ही देशांनी एक दुस-याच्या सैनिकी तळांना टार्गेट केले. तर पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. रहिवाशी, धार्मिक, शाळा आणि रुग्णालयावर सुद्धा पाकिस्तानकडून हल्ला चढवण्यात आला. नागरी वस्त्यांना टार्गेट करण्यात आले. त्यात नुकसान झाले. काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने शाळांवर गोळीबार केला. त्यात घरांचे आणि शाळांचे मोठे नुकसान झाले.
पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर
दरम्यान पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेजवळ जमा होत असल्याचे दिसून आल्याची माहिती आज लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयाने घेतलेल्या संयु्क्त पत्रकार परिषदेत दिली. सीमेलगत पाकिस्तानी सैन्य पाठवण्यात येत असल्याने या भागात संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पाकिस्तानने कालपासून पंजाबमधील विविध भागावर हल्ले चढवले आहे. श्रीनगर, अवंतीपुरा आणि उधमपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर सुद्धा हल्ला चढवला.