नवी दिल्ली : भारताने २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याचा बदला ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरने घेतला. या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची यादी आज एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली आहे. कंधार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड मोहम्मदसह ५ जणांची नावे आहेत. मुंबई हल्ल्यात सहभागी असलेला युसूफ अझहर आणि अबू जुंदाल यांचा समावेश आहे. युसूफ अझहर हा जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा नातेवाईक आहे.
शनिवारी सकाळी १०:३० वाजता पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईची माहिती भारतीय संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने दिली. कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, भारताने ८ लष्करी तळांवर हल्ला केला. यामध्ये पाकिस्तानी हवाई तळ आणि शस्त्रास्त्रे डेपोंचा समावेश आहे. बीएसएफने एक व्हिडिओ जारी केला आणि म्हटले की पाकिस्तानातील सियालकोटमधील लुनी येथे दहशतवादी लाँचपॅड नष्ट करण्यात आले आहे.
शुक्रवारी संध्याकाळी ७.४७ ते १०.५७ दरम्यान पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमधील २६ शहरांमध्ये ५५० हून अधिक ड्रोन डागले. हा हल्ला भारतीय सैन्याने हाणून पाडला. शनिवारी सकाळी पाकिस्तानने पुन्हा जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि गुजरातवर हल्ला केला. या गोळीबारात राजौरीच्या एका प्रशासकीय अधिका-यासह पाच जणांचा मृत्यू झाला. जम्मू शहरातही हवाई हल्ले सुरूच आहेत. अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
ऑपरेशन सिंदूर ७ मे रोजी मारले गेलेले दहशतवादी, यादी आज आली भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर चालवले. यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा तपशील तीन दिवसांनी उघड झाला. वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने या दहशतवाद्यांबद्दल माहिती दिली आहे.
१. मुदस्सर खादियान उर्फ अबू जुंदाल: लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी. मुरीदके येथील मरकज तैयबाचा प्रभारी. अंत्यसंस्कारात पाकिस्तानी सैन्याने गार्ड ऑफ ऑनर दिला.
२. हाफिज मुहम्मद जमील: जैश-ए-मोहम्मदचा मोठा दहशतवादी. मौलाना मसूद अझहरचा मोठा मेहुणा. बहावलपूरमधील मरकज सुभान अल्लाहचा प्रभारी. तरुणांना कट्टरतावादी बनवण्यात आणि निधी पुरवण्यात सक्रिय होता.
३. मोहम्मद युसूफ अझहर उर्फ उस्ताद जी, मोहम्मद सलीम, घोसी साहब: जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आणि मसूद अझहरचा मेहुणा. दहशतवादी संघटनेत शस्त्रास्त्र प्रशिक्षणाचा प्रभारी. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि आयसी-८१४ विमान अपहरण म्हणजेच कंधार अपहरणाच्या कटात सहभागी होता.
४. खालिद उर्फ अबू अकाशा: लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी. अफगाणिस्तानातून शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात सहभागी होता. जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी. फैसलाबादमध्ये अंत्यसंस्कार झाले. पाकिस्तानी लष्करी अधिका-यांनीही त्यात सहभाग घेतला.
५. मोहम्मद हसन खान: जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी. वडील मुफ्ती असगर खान काश्मिरी, पीओकेमधील जैशचे ऑपरेशनल कमांडर. जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या नियोजनात मोहम्मद हसनने महत्त्वाची भूमिका बजावली.