नवी दिल्ली : सध्याच्या भारत-पाकिस्तान वाढत्या तणावादरम्यान भारताने मोठा निर्णय घेतला असून भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य युद्ध समजले जाईल. त्यानुसार त्याला चोख प्रत्युत्तर देऊ, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे. याबाबतची माहिती सुत्रांनी दिली आहे.
तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पश्चिम सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चपदस्थ अधिका-यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आणि तिन्ही दलांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. यापूर्वी, चौहान यांनी सिंह यांना सुरक्षेच्या परिस्थितीची माहिती दिली होती.
७ मे रोजी पहाटे भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर (एलओसी) ड्रोनचा वापर करुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जड-कॅलिबर आर्टिलरी बंदुकींनी गोळीबार केला. ज्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांनी पंजाबमधील अनेक हवाई तळांवर क्षेपणास्त्रांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यांनी उधमपूर, पठाणकोट, आदमपूर आणि भूज येथील भारतीय हवाई तळांवर हल्ला केला. जम्मू आणि काश्मीरमधील तीन हवाई तळांवरील हॉस्पिटल आणि शाळांच्या इमारतींवर हल्ला केला. जम्मू भागातील आरएस पुरा येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आठ बीएसएफ जवान जखमी झाले आहेत. पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.