पुणे : कर्वेनगर परिसरात हमास या वादग्रस्त संघटनेच्या समर्थनार्थ पोस्टर्स वाटणा-या काही तरुणांना भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिकच्या माहितीनुसार, काही तरुणांनी कर्वेनगर परिसरात हमासच्या समर्थनार्थ पोस्टर्स वाटण्यास सुरुवात केली. या घटनेची दखल घेत स्थानिकांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित तरुणांना चोप दिला. दरम्यान, काहींनी या घटनेचे व्हीडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर शेअर केले. या घटनेचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
या प्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली असून संबंधित तरुणांकडून चौकशी सुरू आहे. स्थानिक नागरिकांनी या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी या घटनेचा गंभीर दखल घेतला असून पोस्टर्समागील हेतू आणि त्यामागील कोणाचा हात आहे, याचा तपास सुरू केला आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले की कोणत्याही प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण करणा-या कृतींना मुभा दिली जाणार नाही. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.