मालेरकोटला : पंजाबच्या मालेरकोटला पोलिसांनी भारतीय सैन्याशी संबंधित गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवणा-या दोघांना अटक केली आहे. ही माहिती दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात (राजनयिक दूतावास) तैनात असलेल्या एका पाकिस्तानी अधिका-याला पाठवली जात होती.
या आरोपींना ऑनलाइन पेमेंट मिळत होते. ते पैशाच्या बदल्यात भारतीय सैन्याच्या कारवायांची माहिती पाकिस्तानला पाठवत असे. पोलिसांना ठोस माहिती मिळाल्यावर, प्रथम एका व्यक्तीला पकडण्यात आले, ज्याने चौकशीदरम्यान दुस-या व्यक्तीचे नाव सांगितले आणि त्यालाही अटक करण्यात आली.
त्यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत आणि गुन्हा (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव यांनी या संदर्भात माहिती शेअर केली आहे. ते म्हणाले की, पंजाब पोलिस भविष्यातही देश आणि राज्याच्या सुरक्षेसाठी अशाच पद्धतीने काम करत राहतील.