लातूर : प्रतिनिधी
लग्न समारंभ व उत्सवात मानाने डोक्यावर बांधलेला रंगीबेरंगी फेटा म्हणजे गौरव, प्रतिष्ठा आणि अभिमानाचं प्रतिक. म्हणून पाहुण्यांना फेटे बांधण्यात येतात. यासाठी मोठा खर्च ही केला जातो; परंतु समारंभ संपताच हेच फेटे इतरत्र फेकले जातात व पायदळी तुडवले जातात आणि अखेरीस कच-यात जमा होतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिमाखदार वाटणारा हा प्रकार नंतर लाजीरवाणा वाटतो. त्यामुळे ही पैशांची नासाडी थांबवण्याची व याबद्दल आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्यात प्रत्येक सण, विधी आणि समारंभ म्हणजे एक सांस्कृतिक ठेवा आहे. त्यातही विवाह सोहळा म्हणजे एक धार्मिक, सामाजिक आणि पारंपरिक मूल्यांची गाथा. अशा प्रत्येक विवाह सोहळ्याचे एक आकर्षण म्हणजे पुरुषांच्या डोक्यावर बांधलेला रंगीबेरंगी फेटा. फेटा म्हणजे गौरव, प्रतिष्ठा आणि अभिमानाचं प्रतिक. पण खेदाची गोष्ट अशी की आज हा फेटा गौरव न राहता केवळ सजावट बनून राहिला आहे. विवाहानंतर सन्मानाने डोक्याला बांधण्यात आलेले फेटे खुर्च्यांवर, जमिनीवर फेकले जातात. हेच फेटे कार्यक्रम संपताच पायदळी तुडवले जातात.
हे केवळ कपड्यांचे नव्हे, तर संस्कृतीचेही विटंबन आहे. आज या परंपरेचा व्यावसायिक उपयोग आणि क्षणिक आकर्षण म्हणून झालेला अवमान पाहून मन खिन्न होते. बहुसंख्य फेटे नायलॉन, मिश्रित कापडांपासून तयार होतात. हे कापड पुनर्प्रक्रियेसाठी अयोग्य असते. त्यामुळे एकदा वापरून फेकले गेलेले फेटे वर्षानुवर्षे विघटित होत नाहीत आणि पर्यावरणावर दुष्परिणाम करतात. एक फेटा तयार होण्यासाठी १०० ते ५०० रुपये पर्यंत खर्च होतो. एका लग्नात किमान ५० ते १०० फेटे वापरले जातात. म्हणजे ५ हजार ते ५० हजार रुपयांची नासाडी आणि हे सर्व केवळ काही तासांसाठी.
काही सकारात्मक उपाय व बदलाची सुरुवात आपण आपल्यापासून करु शकतो. फेट्यांबाबत आपण काही ठोस पावले उचलू शकतो. फेटा हा केवळ एक कपडा नाही. तो आपल्या संस्कृतीचा शिरपेच आहे. त्याचा अनाठायी वापर म्हणजे आपल्याच मुळांना विसरणे होय. विवाहासारख्या पवित्रसमारंभात पैशांची उधळपट्टी न करता सजगतेने आणि परंपरेला सन्मान देत त्याचे पालन करणे हीच खरी आधुनिकता आहे. फेटा हा सन्मानाचा आहे तो जमिनीवर नव्हे, मनात आणि मस्तकावर असायला हवा. तेंव्हा विवाह सोहळ्याच्या ठिकाणीच फेटे फेकून न देण्याबाबत सूचना लावणे, सोशल मीडियावर त्याचा प्रचार करणे आणि सामाजिक संस्थांनी प्रबोधन करणे गरजेचे आहे.