निलंगा : प्रतिनिधी
जनतेच्या सेवेसाठी राज्य सरकारकडे केलेल्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून निलंगा आगरास पहिल्या टप्प्यात तीन नव्या एसटी बस देण्यात आल्या आहेत. या तिन्ही गाड्यांचा लोकार्पण रविवार दि. ११ मे रोजी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नातून निलंगा आगारातील सर्व प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी यापूर्वीच आगाराला नवीन बसगाड्या देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. शिवाय राज्य शासनाच्या निधीतून निलंगा येथे नव्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली. नवे बसस्थानक व प्रवाशांची वाढती संख्या पाहून आगाराला नव्या बस मिळाव्यात यासाठी परिवहन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे लेखी मागणी केली होती. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील तीन बसेस आगारात उपलब्ध झाल्या असून लवकर आणखी गाड्या आगारात दाखल होणार आहेत. या गाड्याचे लोकार्पण संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, जिल्हा उपाध्यक्ष शेषराव ममाळे, शहराध्यक्ष रवी फुलारी, विरभद्र स्वामी, किशोर लंगोटे, लातूर येथील विभागीय सह अभियंता दिलीप जाधव , आगार व्यवस्थापक अनिल बिडवे, मच्छिंद्र कोळी, श्रुतीताई जगदाळे, प्रमोद जीवने, राजेंद्र बिरादार, बाळासाहेब जाधव, शरद शिंदे, गिरीश नाईक, शाहू कांबळे, माधव पवार, रवि पांचाळ, बसवराज मठपती, व्यंकट सांडूर, वैभव धैर्य, छायाताई परीट आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.