मुंबई : भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाचे वातावरण असताना थायलंडमध्ये सुट्यांचा आनंद घेणा-या कॉमेडियन भारती सिंहला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. देशात संघर्षाचं वातावरण असताना आणि विशेष म्हणजे कुटुंबीय अमृतसरमध्ये तणावात असताना भारती परदेशात फिरायला गेल्यामुळे नेटक-यांनी तिच्यावर टीका केली.
त्यावर आता तिने रडत-रडत तिची बाजू मांडली आहे. भारतीने तिच्या युट्यूब चॅनलवर एक व्लॉग पोस्ट करत या सर्व गोष्टीवर स्पष्टीकरण दिले आहे. यामध्ये ती नेटक-यांच्या तिखट प्रतिक्रिया वाचून दाखवताना भावूक होते. ‘तुला लाज वाटली पाहिजे, तुझं सर्व कुटुंब अमृतसरमध्ये आहे, इथे देश तणावात आहे आणि तू थायलँडला फिरतेय’, अशा प्रतिक्रिया तिने वाचून दाखवल्या आहेत. दुसरीकडे भारतीच्या कुटुंबीयांना अमृतसरमध्ये अनिश्चिततेचा सामना करावा लागतोय.
या व्लॉगमध्ये भारती म्हणते माझे सर्व कुटुंबीय सुरक्षित आहेत. शहर आणि देशात सध्या तणावाचे वातावरण असले तरी माझे कुटुंबीय सुरक्षित आहेत. मला माझ्या देशावर आणि सरकारवर पूर्ण विश्वास आहे. भारत एक मजबूत राष्ट्र आहे आणि त्याला कोणीच धक्का पोहोचवू शकत नाही. जेव्हा मी तुमचे कमेंट्स वाचते, तेव्हा मला राग येत नाही. मला इतकंच वाटतं की तुम्ही खूप भोळे आहात. मी सर्वांना हे स्पष्ट करू इच्छिते की मी थायलँडला एका कामासाठी आली आहे. इथे मी सुट्यांचा आनंद घ्यायला आले नाही. आमच्याकडे दहा दिवसांचे शूटिंग होते आणि या प्रोजेक्टसाठी आम्ही तीन-चार महिन्यांपूर्वीच होकार दिला होता. त्यामुळे कामाप्रती असलेली वचनबद्धता आम्हाला पाळावी लागेल. त्यासाठी बरीच तयार झाली होती, पैसे खर्च झाले होते.