32.7 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeमहाराष्ट्रजवानांनी केला माओवाद्यांचा तळ नष्ट

जवानांनी केला माओवाद्यांचा तळ नष्ट

छत्तीसगड सीमेवर जोरदार चकमक

गडचिरोली : एकेकाळी माओवाद्यांचे आश्रयस्थान असलेल्या छत्तीसगड सीमेवरील भामरागड तालुक्यातील कवंडे गावात ९ मार्च रोजी पोलिसांनी २४ तासांत पोलिस ठाणे उभारले होते. या कवंडे गावालगत ११ मे रोजी माओवाद्यांनी तळ ठोकल्याची माहिती मिळाल्यावरून सी-६० जवानांनी अभियान राबविले. यावेळी जवान व माओवाद्यांत जोरदार धुमश्चक्री झाली. यावेळी माओवाद्यांचा तळ उध्दवस्थ करण्यात जवानांना यश आले. जवान आक्रमक झाल्यानंतर माओवाद्यांनी तेथून काढता पाय घेतला.

माओवाद्यांचे आश्रयस्थान मानल्या जाणा-या छत्तीसगड सीमेलगत पेनगुंडा, नेलगुंडा व पाठोपाठ कवंडे या गावात चालू वर्षी पोलिस ठाणे उभारण्यात आले आहे. त्यामुळे माओवाद्यांची पुरती कोंडी झाली आहे.तथापि, ११ मे रोजी काही माओवादी कवंडे गावाजवळ जंगलात तळ ठोकून बसले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना मिळाली. त्यानुसार, अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी- ६० च्या २०० जवानांनी अभियान राबविले.

१२ मे रोजी माओवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला, त्यास सी-६० जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. २ तासांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी माओवाद्यांशी अधूनमधून गोळीबार झाला.

घटनास्थळावरुन साहित्य केले जप्त
माओवादी पळून गेल्यानंतर परिसरात शोधमोहीम राबविली. यात दोन शस्त्रे जप्त केली. एक स्वयंचलित इन्सास आणि एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझिन, जिवंत काडतुसे, डेटोनेटर, एक रेडिओ, ३ पिथस, डब्ल्यूटी चार्जर आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी साहित्य आढळले.

माओवाद्यांचे मृतदेह आढळले नाहीत : एसपी
चकमकीनंतर परिसरात नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे. या चकमकीनंतर परिसरात शस्त्रे व साहित्य आढळून आले, ते जप्त केले आहे. माओवाद्यांचा मृतदेह आढळून आला नाही, पण ते जखमी किंवा मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर माओवाद्यांनी त्यांना तेथून नेले असावे, अशी शक्यता असल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR