नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. काँग्रेसने नेते प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. ही याचिका गुणवत्ता हीन असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २०२४ च्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातील विजयाला काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. या याचिकेत त्यांनी निवडणुकीदरम्यान प्रक्रियात्मक त्रुटी आणि भ्रष्ट पद्धतींचा वापर करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांचा विजय अवैध ठरवावा, अशी मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.
या याचिकेच्या पार्श्वभूमीवर, न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या न्यायपीठाने देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले असून, त्यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले होते. या याचिकेत, ईव्हीएम वापराबाबत आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्याचा, व्हीव्हीपॅटची मोजणी न केल्याचा आणि निवडणूक आयोगाने आवश्यक नोटिफिकेशन न काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोघांमध्ये विजयाचा फरक ३९,७१० मतांचा
महाराष्ट्र विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल विनोदराव गुडधे पाटील यांचा पराभव करून विजय मिळवला होता. यात देवेंद्र फडणवीस (भाजप) यांना १,२९,४०१ मते (५६.८८% मते) तर प्रफुल्ल गुडधे पाटील (काँग्रेस) यांना ८९,८९९ मते (३९.४३% मते) मिळाली होती. या दोघांमध्ये विजयाचा फरक ३९,७१० मतांचा होता. या विजयामुळे फडणवीस यांनी २००९ पासून सलग चौथ्यांदा नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात विजय मिळवला आहे.