मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सोमवार दि. १२ मे रोजी लष्कराच्या अधिका-यांसोबत समन्वय बैठक घेतली असता राज्यातील नागरी सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे.
या बैठकीत नागरी सुरक्षेच्या मुद्यावर सखोल चर्चा करण्यात आली. भारतीय सैन्याने पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिली आहे. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि त्यांचे लष्करी तळ उद्ध्वस्त केले असे फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांचे सरकारी निवासस्थान वर्षा येथे नागरी सुरक्षेच्या मुद्यावर लष्करी अधिका-यांसोबत बैठक बोलावली. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना या बैठकीत मुंबईसह महाराष्ट्राच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आल्याचे सांगितले.
फडणवीस म्हणाले की राज्याच्या नागरी सुरक्षेबाबत आज एक बैठक झाली. युद्धसदृश परिस्थितीमुळे सरकारने याआधीच आपल्या विविध विभागांची बैठक बोलावली होती. पण त्यावेळी लष्कराचे अधिकारी देश सुरक्षित ठेवण्यात व्यग्र होते. त्यामुळे त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही. पण आमचा त्यांच्याशी चांगला समन्वय होता.
भविष्यात अशा घटनांना तोंड कसे देणार?
आजच्या बैठकीत गेल्या काही दिवसांच्या अनुभवावरून आपल्याला आणखी काय करण्याची आवश्यकता आहे? भविष्यात आपला रोडमॅप काय असावा? आपण सतर्क कसे राहावे? यावर चर्चा झाली. सैन्याकडून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या आणि आम्ही देखील काही गोष्टींबाबत चिंता व्यक्त केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
काय करावे लागणार?
मुंबई शहराबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की पाकिस्तानला माहित आहे की, ते भारताविरुद्ध युद्ध लढू शकत नाहीत. त्यामुळे पाठीवर वार करतात. देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही अतिशय संवेदनशील आहे. त्यामुळे कोणती खबरदारी घ्यावी आणि समन्वय कसा प्रस्थापित करायचा यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. आम्हाला कुठे जास्त लक्ष द्यायचे आहे हे आम्हाला समजले. आम्ही भविष्यात त्यानुसार काम करू.