वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या आठवड्यात आखाती देशांच्या दौ-यात कतारच्या राजघराण्याकडून लक्झरी बोईंग ७४७-८ जम्बो जेट भेट म्हणून स्वीकारण्याची शक्यता आहे. अमेरिकी अधिकारी या विमानाचे रूपांतर संभाव्य अध्यक्षीय विमानातही करू शकतात, असे मानले जात आहे.
जानेवारी २०२९ मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करण्यापूर्वी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत विमान एअर फोर्स वनमध्ये नवीन भर म्हणून या विमानाचा वापर करतील. नवीन व्यावसायिक ७४७-८ विमानाची किंमत सुमारे ४०० दशलक्ष डॉलर म्हणजेच ३.३ हजार कोटी रुपये आहे.
डेमोक्रॅट्स आणि सुशासनाच्या समर्थकांनी या कथित योजनेचा निषेध केला आहे आणि म्हटले आहे की, यामुळे मोठ्या प्रमाणात नैतिक आणि कायदेशीर चिंता निर्माण झाली आहे. सिनेटचे डेमोक्रॅटिक सिनेटर चक शूमर यांनी ‘एक्स’वर लिहिले की, ‘कतारने आणलेल्या एअर फोर्स वनप्रमाणे ‘अमेरिका फर्स्ट’ असे काहीही म्हणत नाही. ही केवळ लाच नाही, तर अतिरिक्त लेगरूमसह परकीय प्रभाव आहे.
व्हाईट हाऊसने अद्याप या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कतारचे प्रवक्ते अली अल-अन्सारी यांनी सांगितले की, भेटवस्तूबद्दलचे वृत्त चुकीचे आहे कारण विमानाच्या संभाव्य हस्तांतरणाचा अद्याप विचार केला जात आहे आणि ‘कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.’