अंकारा : वृत्तसंस्था
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या प्रयत्नांना मोठे यश प्राप्त झाले आहे. स्वतंत्र प्रदेशाची मागणी करणा-या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी (पीकेके) ने तुर्की सरकारविरुद्ध ४० वर्षांपासून सुरू असलेला लढा थांबवून शस्त्रे टाकण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपली स्वतंत्र प्रदेशाची मागणीही मागे घेतली असून, तुर्कीमध्ये सामील होण्यास होकार दिला आहे.
सोमवारी पीकेकेच्या आत्मसमर्पणाचे वृत्त फिरात न्यूज एजन्सीने दिले. पीकेकेने त्यांचे नेते अब्दुल्ला ओकलन याच्या आवाहनावरुन स्वत:ला तुर्कीत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. ओकलनवर देशद्रोह आणि फुटीरतावाद पसरवण्याचा आरोप असून, तो सध्या तुरुंगात आहे. फेब्रुवारीमध्येच त्याने पीकेकेला शस्त्रे टाकून गट विसर्जित करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, पीकेकेवर तुर्की, युरोपियन युनियन, ब्रिटन आणि अमेरिकेने दहशतवादी गट म्हणून बंदी घातली आहे.
तुर्कीच्या एकूण लोकसंख्येच्या २० टक्के लोक कुर्द आहेत. पीकेकेच्या बंडाचा उद्देश सुरुवातीला कुर्दांसाठी स्वतंत्र देशाची मागणी करणे होता, परंतु नंतर हा गट ध्येयांपासून दूर गेला आणि त्याऐवजी कुर्दांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करू लागला. तुर्की सरकार आणि पीकेके यांच्यातील लढाईत आतापर्यंत ४० हजाराहून अधिक लोक मारले गेले आहेत. यातील बहुतांश पीकेकेचे सैनिक होते. शस्त्रास्त्रे टाकण्याची घोषणा करताना, पीकेकेने म्हटले की, आम्ही आमचे ऐतिहासिक ध्येय पूर्ण केले आहे. आता आमचा सशस्त्र संघर्ष संपला असून, यापुढे कुर्दिश समस्या लोकशाही मार्गाने सोडवल्या जातील.
पीकेकेचा इतिहास काय?
पीकेके ही एक दहशतवादी संघटना आहे, जी १९७८ मध्ये आग्नेय तुर्कीमध्ये अब्दुल्ला ओकलन यांनी स्थापन केली होती. या गटाची विचारसरणी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारांवर आधारित आहे. स्वतंत्र कुर्दिस्तान निर्माण करण्याच्या उद्देशाने पीकेकेने १९८४ मध्ये तुर्कीविरुद्ध बंड सुरू केले. परंतु नंतर या गटाने वेगळ्या देशाची मागणी सोडून दिली आणि आग्नेय तुर्कीयेमध्ये कुर्दांसाठी स्वायत्त प्रदेशाची मागणी करण्यास सुरुवात केली.