लातूर : प्रतिनिधी
वाढती लोकसंख्या, दिवसेंदवस वनांचे कमी होत चाललेले क्षेत्र, बेसुमार होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानवाढ ही जागतिक समस्या बनली आहे. या उन्हाळ्यात नागरिकांना तापमानवाढीचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो आहे. ज्या लातूरचा पारा दरवर्षी ३८ च्या आसपास राहायचा तो यंदा ४२ च्या वरी गेल्याने नागरिकांनी सावध होण्याची गरज असून, येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन करण्यासाठी रविवारी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. ‘अब की बार पारा @४२ पार’ या फलकानी लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले.
गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पर्यावरण क्षेत्राकडे होत चाललेले दुर्लक्ष यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. जागतिक तापमानवाढ हा जगासमोरील मोठा प्रश्न आहे. लातूर जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात तापमानाचा पारा हा ३८ च्या आसपास असायचा. मात्र, यंदा लातूर जिल्ह्यातील औराद शहाजनी येथील पारा ४३ पेक्षाही जास्त होता. ज्याची नोंद महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक तापमान म्हणून झाली होती. शिवाय, या उन्हाळ्यात लातूर जिल्ह्याचा पारा हा ४२ सेल्सिअस पेक्षाही अधिक होता. यामुळे या उन्हाळ्यात नागरिकांना तापमानवाढीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. हा त्रास भविष्यात कमी करायचा असेल तर येत्या पावसाळ्यात प्रत्येकाने वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे अत्यंत महत्वाचे आहे, याकडे लातूरकरांचे लक्ष वेधण्यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी छञपती शिवाजी महाराज चौक आणि जिल्हा क्रीडा संकुल येथे फलक हातात घेऊन जनजागृती केली. अब की बार पारा @४२ पार, असे मजकूर असणारे हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या उपक्रमात कोझी ग्राफिक्सचे बालाजी गायकवाड, वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.योगेश शर्मा, उपाध्यक्ष रामेश्वर बावळे, कार्याध्यक्ष अमोल आप्पा स्वामी आदींनी सहभाग नोंदवला. या उपक्रमासाठी कोझी ग्राफिक्सची मोठी मदत झाली.
लातूर जिल्ह्यात यावर्षी पाऊस अत्यल्प झाला. लातूरला वारंवार दुष्काळ पडतोय या मागचे मूळ कारण म्हणजे वनांचे कमी क्षेत्र होय. लातूरचे वनक्षेत्र वाढावे यासाठी गेल्या आठ वर्षांपासून वसुंधरा प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था कार्यरत आहे. कोणाचीही कसलीही आर्थिक मदत न घेता प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी स्वत: शक्य तितके पैसे जमा करतात आणि त्यातून वृक्ष लागवड आणि संवर्धन कार्य केले जाते. वृक्षांची चळवळ ही लोकचळवळ व्हावी यासाठी वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने येत्या पावसाळ्यात ‘एक व्यक्ती:एक वृक्ष’ हे अभियान हाती घेऊन प्रत्येकाला वृक्ष लागवड आणि संवर्धन साठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पर्यावरण दिनी अर्थात ५ जून रोजी या विशेष अभियानाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानने दिली आहे.