पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेला इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. तर यंदाच्या वर्षी राज्यात २८५ विद्यार्थ्यांना ३५% टक्के मिळाले आहेत.
राज्यात ३५ टक्के मिळवणा-या विद्यार्थ्यांबद्दल सांगायचं झाले तर, पुणे ५९ विद्यार्थी, नागपूर ६३ विद्यार्थी, छत्रपती संभाजी नगर २८ विद्यार्थी, मुंबई ६७ विद्यार्थी, कोल्हापूर १३ विद्यार्थी, अमरावती २८ विद्यार्थी, नाशिक ९ विद्यार्थी, लातूर १८ विद्यार्थी, कोकण ० विद्यार्थी, एकूण २८५ विद्यार्थ्यांना ३५ टक्के गुण मिळाले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दहावीच्या निकालाची वैशिष्टये सांगितली. विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना गुण पडताळणी करण्याची सोय देखील करून दिली आहे.
उद्यापासून म्हणजे १४ मे पासून २८ मे पर्यंत गुण पडताळणी करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना फी भरावी लागणार आहे. गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी ५० रुपये भरावे लागणार असल्याची माहिती देखील अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
राज्यात १०० टक्के मिळवलेले विद्यार्थी
राज्यात १०० टक्के मिळवलेले विद्यार्थी २११ आहेत. त्यात पुण्यात १३, नागपूरमध्ये ३, संभाजीनगर ४०, मुंबई ८, कोल्हापूर १२, अमरावती ११, नाशिक २, लातूर ११३, कोकण ९ विद्यार्थी १०० टक्क्यांसह उत्तीर्ण झाले आहेत.
नापास विद्यार्थ्यांना मिळाणार ११ वीत प्रवेश
एटीकेटी असल्यामुळे एक किंवा दोन विषयात विद्यार्थी नापास झाला तरी ११ वीत प्रवेश दिला जातो. १२ वी ला जाण्यापूर्वी फेब्रुवारीतील परीक्षा उत्तीर्ण झाला आणि ११ वीची परीक्षा पास झाला तर विद्यार्थी १२ वीसाठी प्रवेश घेण्यास पात्र ठरू शकतो.