पुणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांना एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे. त्यामुळे भारताची जागतिक प्रतिमा आणि दहशतवादाच्या विरोधातील लढाईला ठेच पोहोचत असल्याने त्यांचे विधान भारतीय मनाला पटणारे नाही.
या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या वक्तव्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर एक अर्थाने टीका केली आहे. अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती असे देखील रोहित पवार यांनी म्हटले आहे.
युद्धविराम करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना व्यापार थांबवण्याची धमकी दिली आणि युद्ध थांबवल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालणारे तर आहेच शिवाय डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानकडे एकाच चष्म्याने बघत एकाच तराजूत तोलण्याचे पाप केले आहे. यामुळे भारताची जागतिक प्रतिमा, भारताचे सार्वभौमत्व, दहशतवादाविरुद्धची लढाई याला ठेच पोचत असल्याने ट्रम्प यांचे विधान भारतीय मनाला पटणारे नाही.
भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती
काल संध्याकाळी पंतप्रधानांच्या देशाला संबोधित करण्याच्या अर्धा तास आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे धक्कादायक विधान केले असता पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात अमेरिकेचा दावा खोडून काढत अमेरिकेला भारताची कणखरता दाखवण्याची गरज होती. संपूर्ण देश, सर्व राजकीय पक्ष सरकारसोबत आहेत, परंतु अमेरिकेसारखा देश असली विधाने करत असताना केंद्र सरकार याबाबत बोलत नसेल तर हे मात्र ट्रम्प यांच्या विधानाहून अधिक दु:खद आहे.
केंद्र सरकारने उत्तरे द्यावीत
या संवेदनशील विषयांवर चर्चा करणे सद्यस्थितीत योग्य नसले तरी केंद्र सरकारला या प्रश्नांची उत्तरे देशाला द्यावीच लागतील, शक्य तेवढया लवकर केंद्र सरकारने अधिवेशन बोलवून जनतेला सत्य सांगितले पाहिजे. आमदार रोहित पवार यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली आहे.