15.7 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeउद्योगभारताच्या परकीय चलनसाठ्यात वाढ

भारताच्या परकीय चलनसाठ्यात वाढ

अर्थव्यवस्था जागतिक उलथापालथींना तोंड देण्यास सक्षम साठा ६०० अब्ज डॉलर्सवर

नवी दिल्ली : चार महिन्यानंतर प्रथमच भारताचा परकीय चलनसाठा एक डिसेंबर रोजी ६०० अब्ज डॉलरवर गेला आहे. मागील आठवड्यात म्हणजे २४ नोव्हेंबर रोजी आपला परकीय चलनसाठा ५९७.९३ अब्ज डॉलर होता.

यापूर्वी भारताचा परकीय चलनसाठा यावर्षी ११ ऑगस्ट रोजी ६०० अब्ज डॉलरवर गेला होता. एक डिसेंबर रोजी आता हा साठा ६०४ अब्ज डॉलरवर गेला आहे. त्यामुळे आपल्या आयातीचा खर्च आपण सुरळीतपणे भागवू शकतो, असा विश्वास असल्याचे रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी द्वैमासिक पतधोरणाची माहिती देताना सांगितले. यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये भारताचा परकीय चलनसाठा सर्वकालिक उच्चांकावर म्हणजे ६४२ अब्ज अमेरिकी डॉलरवर गेला होता. त्यानंतर गेला वर्षभर रुपया घसरत चालल्यामुळे त्याची घसरण थोपवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने बाजारात अमेरिकी डॉलर विकल्याने हा साठा घसरला होता.

तरीदेखील या वर्षात आपल्याप्रमाणे वाढत्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाने कमी चढउतार दाखवले आहेत असेही ते म्हणाले. रुपया त्यातुलनेत स्थिर राहिल्याने देशाची सूक्ष्म आर्थिकअवस्था चांगली असल्याचेच दिसून येते. यापुढेही जागतिक आर्थिक उलथापालथी झाल्या तरी त्याला तोंड देण्याची भारतीय अर्थव्यवस्थेची क्षमताही त्यातून दिसते, असेही ते म्हणाले. चीन, रशिया, मलेशिया, तुर्कस्थान, व्हिएटनाम, दक्षिण आफ्रिका, थायलँड आदी देशांच्या तुलनेत भारतीय रुपयाचा डॉलरशी असलेला विनिमय दर ०.६६ असा सर्वात कमी असल्याचेही दास यांनी दाखवून दिले.

२४.६ अब्ज डॉलर्स भारतात
गेली दोन वर्षे परकीय वित्तसंस्था आपला निधी भारतातून परत नेत होत्या. मात्र या वर्षात त्यांनी सहा डिसेंबरपर्यंत २४.९ अब्ज अमेरिकी डॉलर भारतात आणल्याचेही ते म्हणाले.

गतवर्षी २०.८ अब्ज थेट गुंतवणूक
तर मागीलवर्षी भारतात २०.८ अब्ज अमेरिकी डॉलर ची थेट परकीय गुंतवणूक झाली होती. यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान देशात १०.४ अब्ज अमेरिकी डॉलर एवढी थेट परकीय गुंतवणूक झाल्याचेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR