पुणे : वृत्तसंस्था
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पावले उचलली. त्यानंतर नरमलेल्या पाकिस्तानाने अमेरिकेच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी केली. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले. सिमला करारानुसार तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारताने सिमला कराराचे पालन करावे आणि तिस-या देशांचा हस्तक्षेप टाळावा. १९७२ च्या सिमला करारानुसार, जम्मू-काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान या दोन देशांदरम्यानच सोडवला जावा, असे ठरले. त्यामुळे कोणत्याही तिस-या देशाने किंवा आंतरराष्ट्रीय संस्थेने या विषयात हस्तक्षेप करू नये. काश्मीरविषयी तिस-या देशाने बोलणे किंवा मध्यस्थी करणे कराराच्या विरोधात आहे, असे पवारांनी स्पष्ट केले.
सिमला करार हा भुत्तो आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्यात झाला. आमच्या देशाचे मुद्दे आम्ही सोडवू, आमचा विषय आम्ही सोडवू, इतरांनी त्यात नाक खुपसण्याचे कारण काय? आपल्या घरगुती वादात तिस-या राष्ट्राचा हस्तक्षेप चालणार नाही. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आमच्या अंतर्गत बाबींबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ आहे.