कोल्हापूर : कोल्हापूरच्या प्रसिद्ध अंबाबाई मंदिरात तसेच ज्योतिबा मंदिरात बुधवारपासून पारंपरिक कपड्यांमध्येच प्रवेश करावा लागणार आहे. या दोन्ही मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. मंदिर परिसरात येताना पारंपरिक कपडे किंवा पूर्ण अंग झाकले जाईल असेच कपडे घालावे.
तोकडे कपडे घालून मंदिर परिसरात येणा-या भाविकांसाठी देवस्थान समितीकडून सोवळ्याची देखील व्यवस्था केली जाणार आहे. याबाबत महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली आहे. आजच्या दिवस मंदिरात येणा-या भाविकांना सूट देण्यात आली आहे. मात्र, उद्यापासून या नियमांचे कडक पालन करावे लागणार आहे असे आवाहन शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांना केले आहे. देवस्थान समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे आवाहन केले आहे. अंबाबाई, जोतिबा मंदिरात संपूर्ण राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येतात. ब-याचवेळा भाविक पारंपारिक कपड्यांमध्ये नसतात किंवा तोकड्या कपड्यांमध्ये असतात. त्यामुळे इथून पुढे दर्शनासाठी येणा-या भाविकांनी पारंपारिक कपडे परिधान करुन यावे, असे आवाहन यातून करण्यात आले आहे.
श्री करवीर निवासनी देवस्थान हे साडेतीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. या मंदिराचे महत्व फार आहे. भाविक धार्मिक विधींसाठी पारंपरिक कपडे परिधान न करता तोकड्या कपड्यांवर येतात. त्यामुळे मंदिरामध्ये धार्मिकतेचा आदर व पालन करून पारंपारिक वेशभूषेत महिला व पुरुष भक्तांनी येऊन सहकार्य करावे असे व्यवस्थापन समितीने पत्रकाद्वारे कळवले आहे. दरम्यान, पारंपरिक कपड्यांचे नियम केवळ कोल्हापूरच्या अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरातच नाहीये. तर अष्टविनायक गणपतीसह ५ मंदिरांसाठी हा ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. चिंचवड देवसस्थानकडून यापूर्वी यासंबंधित पत्रक काढून याबाबत माहिती देण्यात आली होती. विविध देवस्थान ट्रस्टकडून कपड्यांबाबत नियमावली लागू करण्यात आली आहे.