मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी पाकिस्तानकडून केल्या गेलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर सडकून टीका केली आहे. पाकिस्तान आता पाकिस्तान राहिले नसून आतंकीस्तान झाले आहे अशी टीका प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे.
प्रियंका चतुर्वेदी पुढे म्हणाल्या, पाकिस्तानकडून आपल्या इथल्या सामान्य नागरिकांवर हल्ले होत आहेत. त्या देशांनी हे पाहायला पाहिजे, ज्यांनी आयएमएफला कर्ज दिले आहे, जे देश म्हणतात की आम्ही त्यांच्यासोबत व्यापार करणार, त्यांनी बघायला पाहिजे की पाकिस्तान एक धूर्त देश आहे. पाकिस्तान आता पाकिस्तान कमी आणि आतंकीस्तान बनला आहे अशी टीका त्यांनी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली. अमेरिकेच्या मध्यस्थीवरही प्रियंका चतुर्वेदी यांनी टीका केली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे लक्षात ठेवायला हवे की ७/११ च्या हल्ल्यामागे असलेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्येच सापडला होता. मुंबई येथे २६/११ च्या हल्ल्यात अमेरिकेचे देखील नागरिक मारले गेले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारले गेलेल्या आतंकवाद्यांचे अंतिम संस्कार करताना अब्दुल रऊफ हा पाकिस्तानी लष्करासोबत उपस्थित होता. अब्दुल रऊफ हा अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड आतंकवादी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेशी सहमत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे म्हटले की पाकिस्तानसोबत जर काही बोलणी झाली तर त्यात केवळ पीओकेवरच बोलणे होईल. तसेच पाकिस्तान जोपर्यंत दहशतवादी कारवाया करणे बंद करत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत कोणतेही बोलणे केले जाणार नाही, असे मोदींनी स्पष्ट केले आहे. भारतीय जनतेची सुद्धा तीच भावना आहे असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.