मुंबई : सितारे जमीन पर सिनेमाची सध्या चांगलीच उत्सुकता आहे. काल या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. आमिर खान या सिनेमात बास्केटबॉल कोचच्या भूमिकेत दिसत आहे. बास्केटबॉल कोच बनून आमिर दिव्यांग मुलांना शिकवताना दिसणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यावर नेटक-यांनी सितारे जमीन पर हा रिमेक आहे असा शोध लावला आहे.
सितारे जमीन पर सिनेमाचा ट्रेलर पाहून हा सिनेमा सत्य घटनेवर आधारीत आहे असे अनेकांना वाटले. पण असे नाही सितारे जमीन पर हा सिनेमा एका स्पॅनिश सिनेमाचा रिमेक आहे. चॅम्पियन असे या सिनेमाचे नाव. पुढे २०१३ साली याच नावावर आधारीत हॉलिवूड सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आला. चॅम्पियन सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की, ‘सितारे जमीन पर’ हा या सिनेमाचा रिमेक आहे. याआधीही हॉलिवूडच्या फॉरेस्ट गंप सिनेमावर आधारीत आमिरने लाल सिंह चढ्ढा सिनेमा बनवला होता.
‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून अमिताभ भट्टाचार्य यांनी गाणी लिहिली आहेत. चित्रपटाचे निर्माते आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका हे आहेत. २० जूनला हा सिनेमा रिलीज होणार आहे.
आमिर खान प्रोडक्शन्स या सिनेमाद्वारे १० नवोदित कलाकारांना लॉन्च करत आहे. अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. ‘सितारे जमीन पर’चं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे.