कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना मोबाइलवरून धमकाविणारा प्रशांत कोरटकर (वय ५५, रा. नागपूर) याच्या आवाजाच्या फॉरेन्सिक तपासणीला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. पोलिस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक विभागाला पत्रव्यवहार झालेला नाही. त्यामुळे आवाज तपासणी रखडली आहे.
प्रशांत कोरटकर याने २४ फेब्रुवारीच्या रात्री इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकावले होते. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर एक महिन्याने पोलिसांनी त्याला तेलंगणातून अटक केली. पोलिस कोठडीत फॉरेन्सिक विभागाने त्याच्या आवाजाचे नमुने घेतले होते. ते तपासण्यासाठी पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलिस महासंचालक कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, पोलिस महासंचालक कार्यालयाकडून अद्याप फॉरेन्सिक विभागाला पत्र आलेले नाही. त्यामुळे आवाजाच्या नमुन्यांची फॉरेन्सिक तपासणी होऊ शकलेली नाही.
तपास रखडतोय : सावंत
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस महासंचालकांनी तातडीने फॉरेन्सिक विभागाला पत्र पाठवणे अपेक्षित होते. कोरटकर याच्या आवाज तपासणीला विलंब लावण्यामागे गुन्ह्याचा तपास रखडत ठेवण्याचा अधिका-यांचा उद्देश आहे की काय, अशी शंका निर्माण होत असल्याचे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी म्हटले आहे.