मुंबई : सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. सोन्याचा दर आज म्हणजे बुधवारी प्रति १० ग्रॅमसाठी ९६ हजार ५९३ रुपयांवर आला आहे. २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर १ लाख २ हजार ७३ रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे सोन्याच्या दरात आता तोळ्यामागे २० दिवसात जवळपास साडेपाच हजार रुपयांची घसरण झाली आहे. ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण मानली जात आहे.
भारत-पाक युद्ध थांबल्यामुळे आणि अमेरिका-चीनमधील व्यापारयुद्ध टळल्यामुळे आंतरारष्ट्रीय बाजारात वेगाने घडामोडी सुरु आहेत. त्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात ब-यापैकी घसरण पाहायला मिळेल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सध्याच्या काळ हा लग्नसराईचा असल्याने सोन्याच्या दरातील ही घसरण सामान्य वर्गाच्या पथ्थ्यावर पडणारी मानली जात आहे. आगामी काळात सोन्याचा भाव आणखी किती खालपर्यंत घसरणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून उच्चांकी पातळीवर असलेला सोन्याचा दर आता घसरणीच्या मार्गावर आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ९६ हजार ५९३ रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, २२ एप्रिल रोजी हा दर १ लाख २ हजार ७३ रुपयांपर्यंत होता. त्यामुळे अवघ्या तीन आठवड्यांत सोन्याच्या दरात जवळपास ५ हजार ४८० रुपयांची घट झाली आहे.
सोन्याच्या दरात घट होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी. अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढवण्याच्या शक्यतेमुळे डॉलर मजबूत झाला असून त्याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतींवर झाला आहे. तसेच, जागतिक बाजारात सोन्याची मागणीत काहीशी घट झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यासाठी विक्रीचा मार्ग अवलंबला असून त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर झाला आहे.
खरेदीसाठी अनुकुल वेळ
भारतात लग्नसराई सुरु असल्यामुळे अनेक ग्राहक ही घसरण खरेदीसाठी अनुकूल मानत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर यांसारख्या शहरांतील सराफा बाजारांमध्ये ग्राहकांची उपस्थिती वाढत आहे. अनेक सराफ विक्रेत्यांनी सांगितले की, मागील काही दिवसांतील मंदीतून आता बाजार सावरत असल्याचे संकेत मिळत आहेत. तज्ज्ञांच्या मते, सोने दीर्घकालीन गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय असल्यामुळे, सध्याचा दर ही खरेदीसाठी चांगली संधी ठरू शकते. मात्र, जागतिक बाजारातील चढ-उतार लक्षात घेता, गुंतवणुकीचा निर्णय घेताना योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे.