28.6 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeराष्ट्रीयबर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल!

बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल!

आयआयटी रुरकीचा रिपोर्ट । हवामान बदल, वाढणारे तापमान, बदलत्या मान्सून वेळापत्रकामुळे जल प्रणालीवर परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जगातील तिसरे सर्वात मोठे ताज्या पाण्याचे स्त्रोत हिमालयात आहे. या ठिकाणी हिमपर्वत आणि हिमनद्यातून पाणी वाहत असते. जे कोट्यवधी लोकांची तहान भागवते. गंगा नदीचे उगमस्थान जे हिमालयात आहे, तेही ग्लेशियर्स आणि बर्फावर अवलंबून आहे. मात्र हवामानातील बदलामुळे वाढणारे तापमान आणि बदलते मान्सून वेळापत्रक यामुळे जल प्रणालीवर परिणाम होत आहे. हवामान बदलामुळे गंगा नदीच्या वरच्या क्षेत्रात पाण्याचा प्रवाह आणि जल संतुलन यावर काय परिणाम होत आहेत याचा अभ्यास आयआयटी रुरकीच्या संशोधकांनी केला आहे.
आयआयटीच्या रिपोर्टमध्ये भविष्यात नदीचं पाणी, बर्फ वितळणे, हिमनदी आणि भूजल कसं बदलेल याचा शोध घेतला आहे. यासाठी त्यांनी विशेष मॉडेल जसं एसपीएचवाय (स्पॅटिकल प्रोसेसज इन हायड्रोलॉजी) आणि सीएमआयपी ६ जलवायू परिस्थितीचा आढावा घेतला आहे. ही परिस्थिती भविष्यातील तापमान आणि मान्सूनमध्ये होणारे बदल याचा अंदाज लावते. अभ्यासात देवप्रयाग नदीच्या प्रवाहाचे आकडे वापरून मॉडेलची तपासणी आणि सत्यता पडताळली आहे.
सध्याची स्थिती (१९८५-२०१४) : देवप्रयाग नदीत एकूण प्रवाहात ६३.३ टक्के पाऊस, १४.९ टक्के बर्फ वितळणे, १९.८ टक्के हिमनदी आणि १० टक्के भूजल यांचा समावेश आहे. या काळात सरासरी एकूण प्रवाह ७९२ क्यूबिक मीटर प्रतिसेकंद होता. ज्यात पाऊस ५०९.५, बर्फ ११७.५, ग्लेशियर ८६.१, भूजल ७८.९ क्यूबिक मीटर प्रतिसेकंदचे योगदान आहे.
भविष्यातील अंदाज (२०७६-२१००)
    तापमान आणि अतिवृष्टी : २१ व्या शतकाच्या अखेर विशेषत: ररढ ५-८.५ परिस्थितीत तापमान आणि पावसात वाढ होण्याची शक्यता आहे.
    प्रवाहात ५० टक्के वाढ : रिपोर्टनुसार, भविष्यात नदीचा एकूण प्रवाह ५० टक्क्यांनी वाढू शकतो. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पावसामुळे पाण्याच्या प्रवाहात होणारी वाढ असेल. त्यानंतर हिमनदी आणि भूजलचा समावेश असेल.
   बर्फ वितळणे कमी होणार : २०९० पर्यंत बर्फ वितळून होणारे पाणी यात ५७ टक्के कमी होऊ शकते. वाढत्या तापमानामुळे वेगाने बर्फ वितळेल त्यामुळे बर्फाचे भांडार कमी होईल.
    पाण्याची कमतरता नाही : भलेही बर्फ कमी बनेल परंतु पाऊस आणि हिमनदीमुळे पाण्याचा साठा कायम राहील.
रिपोर्टमध्ये महत्त्वाचे काय?
हिमालय क्षेत्रातील नद्या जसे की गंगा, लाखो लोकांची जीवन वाहिनी आहे. या नद्यांमुळे शेती, पेयजल, उद्योगासाठी पाणी मिळते परंतु हवामान बदलामुळे या नद्यांचा प्रवाह बदलत आहे. या रिपोर्टमुळे भविष्यात पाण्याचा अंदाज लावता येईल. या रिपोर्टमुळे सरकारला पूर, दुष्काळ आणि पाणी टंचाईसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी मदत मिळेल. पाण्याचे नियोजन करण्यासाठी सरकारला योग्य ती पावले वेळीच आखता येतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR