27.2 C
Latur
Wednesday, May 14, 2025
Homeलातूरलातूरमध्ये होणार ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’

लातूरमध्ये होणार ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’

लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यात सोयाबीन आणि इतर शेतमालाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळामार्फत ‘सोयाबीन साठवणूक क्लस्टर’ विकसित करण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत लातूर एमआयडीसी परिसरात १० हजार मेट्रिक टन क्षमतेचा सायलो प्रकल्प आणि अत्याधुनिक गोदाम, पानगाव येथे ३ हजार मेट्रिक टन क्षमतेचे नवीन वखार केंद्र, तसेच चापोली येथे १ हजार २०० मेट्रिक टन क्षमतेचे आधुनिक गोदाम उभारण्यात येत आहे.
२०२४ मध्ये नाफेडच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्यात आली. या खरेदीचे साठवणूक नियोजन वखार महामंडळाने स्वमालकीच्या आणि दुप्पट क्षमतेने भाड्याच्या गोदामांद्वारे यशस्वीपणे पार पाडले. यामुळे शेतक-यांना हमीभाव योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला. मात्र, पारंपरिक गोदामांच्या मर्यादित क्षमतेमुळे आधुनिक साठवण सुविधांची गरज निर्माण झाली आहे.
वखार महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांनी शेतकरी हितासाठी सायलो आणि आधुनिक गोदामांच्या उभारणीचे निर्देश दिले. ९ मे २०२५ रोजी राज्यस्तरीय आढावा बैठकीत पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यापुढे या योजनेचे सादरीकरण करण्यात आले.  लातूर एमआयडीसीतील सायलो प्रकल्प हा मुख्यमंत्री यांच्या १०० दिवस कृती आराखड्यात प्राधान्याने समाविष्ट आहे. सायलो बांधकामाची निविदा अंतिम टप्प्यात असून, राज्य शासनाच्या स्मार्ट योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार आहे.
पानगाव येथील वखार केंद्रासाठी बाजार समितीची जागा उपलब्ध झाली असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चापोली येथील गोदामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच बांधकामास सुरुवात होईल. या प्रकल्पांमुळे शेतक-यांना उत्तम दर मिळेपर्यंत माल साठवण्याची सुरक्षित व्यवस्था, गुणवत्ता संरक्षण, वखार पावती आधारित कर्ज सुविधा आणि डिजिटल साठवण प्रणालीचा लाभ मिळेल. १० मे २०२५ रोजी दिवेगावकर यांनी लातूर एमआयडीसी आणि पानगाव येथे भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला आणि प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश दिले. येत्या काही महिन्यांत हे प्रकल्प पूर्ण होऊन लातूर जिल्हा राज्यातील अन्नधान्य साठवण हब म्हणून उदयास येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR