मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला. आयकर अधिकारी अमर पटनायकच्या भूमिकेतून तो पुन्हा पडद्यावर आला. यावेळी अजयसमोर रितेश देशमुख होता. रेड २ ला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सिनेमात वाणी कपूर अजयची पत्नी आहे. तर रेड च्या पहिल्या भागात इलियाना डिक्रुज अजयची पत्नी होती. इलियानालाच दुस-या भागात का घेतले नाही यावरुन सोशल मीडियावर अनेकांनी प्रश्न विचारले होते. आता सिनेमाचे दिग्दर्शक राज कुमार गुप्ता यांनी यावर उत्तर दिले आहे.
२०१८ साली रेड रिलीज झाला होता. अजय देवगणसोबत इलियाना डिक्रुजची जोडी होती. सात वर्षांनी रेड २ आला असून यामध्ये वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहे. यावर नुकतेच एका मुलाखतीत दिग्दर्शक राज कुमार गुप्ता म्हणाले, इलियानाने लग्न केले आणि ती संसारात रमली. तिला मुलगाही झाला. तिची प्राथमिकता ठरलेली होती. तसेच ती भारताबाहेर शिफ्ट झाली. पण पहिल्या भागात तिच्यासोबत काम करुन खूप छान वाटले आणि आमच्यासाठी ती कायमच ‘रेड’चा भाग राहील.
रेड २ मध्ये वाणीच्या एन्ट्रीच्या अजिबातच कोणतीही नकारात्मकता नाही. अनेक वेळा सिनेमांमध्ये अपरिहार्य परिस्थितीत अशा प्रकारे कास्टिंग बदलावी लागते. याआधीही असे झाले आहे आणि या सिनेमातही ते बदल करावे लागले. परिस्थितीच अशी येते की एखादी भूमिका वेगळ्याच कलाकाराला साकारावी लागते. इलियाना रेड चा भाग आहे हे अजिबातच नाकारता येणार नाही असेही ते म्हणाले.