15.6 C
Latur
Friday, January 3, 2025
Homeसंपादकीय विशेषतेलंगणातील ‘सूर्योदय’

तेलंगणातील ‘सूर्योदय’

तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर राव यांची विजयाची हॅट्ट्रिक चुकवण्यामध्ये काँग्रेस पक्षाला यश आले आणि दक्षिणेतील एक महत्त्वाचे राज्य पक्षाच्या भात्यात दाखल झाले. वास्तविक हा काँग्रेसचा विजय नसून बीआरएसचा पराभव असल्याचे काहींचे म्हणणे आहे. कारण केसीआर रावांच्या एकाधिकारशाहीला, घराणेशाहीला जनता कंटाळली होती. परंतु या उणिवा समर्पकपणे मांडून जनतेला नव्या आशा दाखवण्याचे प्रभावी काम नवोदित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केले. यासाठी अपार मेहनतही घेतली. रेवंत या संस्कृत शब्दाचा अर्थ सूर्यपुत्र असा होतो. रेड्डींच्या प्रयत्नांमुळेच काँग्रेसचा सूर्य तेलंगणात उगवला आहे. तथापि त्यांच्यापुढे अनेक आव्हानेही असणार आहेत.

काँग्रेसचा आश्वासक चेहरा म्हणून लोकप्रिय झालेले रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे नवोदित मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत. निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रेवंत रेड्डी आघाडीवर होते. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने त्यांच्या नावाला मंजुरी दिली. रेवंत रेड्डी यांनी विद्यार्थीदशेतच राजकारणाला सुरुवात केली. भाजपच्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. पदवीनंतर ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम् पक्षात सामील झाले. २००९ मध्ये त्यांनी अविभाजित आंध्र प्रदेशच्या कोडंगल मतदारसंघात्ूान विधानसभा निवडणूक जिंकली. पुढे तेलंगणा हे स्वतंत्र राज्य बनल्यानंतर २०१४ मध्ये ते पुन्हा टीडीपीच्या तिकिटावर आमदार झाले. २०१५ मध्ये त्यांना कॅश फॉर व्होट प्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचे वर्णन चंद्राबाबू नायडूंचे एजंट असे करण्यात आले होते. विधान परिषद निवडणुकीत टीडीपीच्या बाजूने मतदान करण्यासाठी एका आमदाराला लाच देण्याचा प्रयत्न कॅमे-यात पकडल्यानंतर त्यांना हैदराबादच्या तुरुंगात पाठवण्यात आले. रेवंत यांनी २०१७ साली काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. कारण २०१८ च्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत व्हावे लागले होते. विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मलकानगिरीतून तिकिट दिले. त्यामध्ये ते केवळ दहा हजार मतांनी विजयी झाले. २०२१ मध्ये काँग्रेसने त्यांना प्रदेशाध्यक्ष केले. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ते काँग्रेसचे पोस्टर बॉय बनले.

आताच्या तेलंगणाच्या विजयात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे काही निरीक्षकांचे म्हणणे आहे. वास्तविक, तेलंगणातील काँग्रेसचा विजय हे चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील भ्रष्ट आणि घराणेशाही सरकारच्या विरोधातील जनतेचे बंड मानले पाहिजे. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी वर्षानुवर्षे सुरू असलेली डाव्या सरकारची सत्ता उलथवून टाकली तेव्हा पश्चिम बंगालच्या लोकांनी २०११ मध्ये डाव्या सरकारच्या विरोधात केलेल्या सार्वजनिक विद्रोहासारखाच प्रकार तेलंगणात दिसून आला. के. चंद्रशेखर राव हेही यापूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राज्य सरकारमधील सत्ता आपल्या कुटुंबाच्या हातात ठेवली. त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घोटाळे यांचे अनेक आरोप झालेले आहेत. त्यामुळे या राज्यातील जनतेला सरंजामशाहीपासून स्वातंत्र्य हवे होते. त्याचा थेट फायदा काँग्रेसला झाला. त्यामुळे या विजयाचे श्रेय राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रे’ला आणि रेवंत रेड्डी यांच्या भूमिकेला देता येणार नाही. तेलंगणात काँग्रेसचा विजय झाला नसून बीआरएसचा पराभव झाला आहे, असे म्हणणे अधिक सयुक्तिक ठरेल. तेलंगणात भाजपचा प्रभाव नाही, त्यामुळे लोकांनी बीआरएसच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यासमोर काँग्रेस हा एकमेव पर्याय होता.

अर्थात राजकारणामध्ये विरोधकांचे कच्चे दुवे, त्यांच्या धोरणात्मक चुका, उणिवा, कामगिरीतील फोलपणा यांचा प्रभावीपणाने प्रचार करून त्या जनतेच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असते. अन्यथा, कमजोर विरोधकांमुळे कुचकामी सरकारेही पुन्हा सत्तेवर विराजमान होतात. भारतीय लोकशाहीने अशी उदाहरणे पाहिली आहेत. त्यादृष्टीने विचार करता रेवंत रेड्डी यांची भूमिका या विजयामध्ये महत्त्वाची राहिली हे नाकारता येणार नाही. रेवंत रेड्डी हे माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची गीताच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर १९९२ मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यांना एक मुलगी नैमिषा रेड्डी आहे. काही महिन्यांपूर्वी नातवाचाही जन्म झाला. तथापि, रेवंत रेड्डी यांनी आपले संपूर्ण लक्ष पक्ष आणि राज्याच्या मुद्यांवर असेल, ही बाब प्रचारसभांमधून सातत्याने मांडली. ते बांधकाम क्षेत्राशी संबंधित असल्याने आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत.
रेवंत रेड्डी सुरुवातीपासूनच जोरदार युक्तिवाद करत होते की, दोन टर्म सरकारचे नेतृत्व करणा-या बीआरएस पक्षाने अनेक घोटाळे केले आहेत. बीआरएस सरकारला प्रश्न विचारण्यात आणि त्यांना समान पातळीवर उत्तरे देण्यात रेवंत यशस्वी झाले. काँग्रेस पक्ष अंतर्गत कलहासाठी ओळखला जात असला, तरी केवळ रेवंत रेड्डीच पक्षाला कोणत्याही मतभेदाशिवाय चालवू शकले, असे ठामपणे मानले जाते. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, विकास आणि कल्याण हे आपले उद्दिष्ट असल्याचे रेवंत यांनी जनतेच्या मनावर बिंबवले.

भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी देशभरातील माध्यमांमधून प्रचंड जाहिरातबाजी करून या राज्याच्या विकासाचा ढोल पिटला असला तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. तेलंगणाची निर्मिती झाली तेव्हा या राज्याच्या तिजोरीत ७००० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल होता. आजची परिस्थिती पाहिल्यास या राज्यावर तितक्याच रकमेचे कर्ज असल्याचे दिसते. अशा स्थितीत रावांची अर्थनीती प्रभावी कशी म्हणता येईल? स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या चळवळीची तीन प्रमुख कारणे होती- रोजगार, पाणी आणि आर्थिक स्थैर्य. केसीआर सरकार तरुणांना नोक-या देण्यात अपयशी ठरले. त्यांनी त्यांचा मुलगा केटीआर, मुलगी कविता आणि नातेवाईक हरिश राव आणि संतोष राव यांच्याभोवती सत्ता केंद्रित केली होती. यामुळेच त्यांना अनेक लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळाला नाही. केसीआर यांनी समाजातील विविध घटकांसाठी रयतु बंधू आणि दलित बंधू यांसारख्या अनेक योजना सुरू केल्या असल्या, तरी त्याचा लाभ गरजू लोकांना मिळू शकला नाही. शेतकरी, तरुण आणि आदिवासी सरकारवर नाराज होते. ही नाराजी मतपेटीतून दिसून आली.

आता नवोदित मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारसमोर मोठी आव्हाने आहेत. नवीन सरकारला तरुण, शेतकरी आणि समाजातील विविध घटकांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे नव्या काँग्रेस सरकारला जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करावे लागणार आहे. काँग्रेसने तेलंगणात सरकार स्थापन केल्यास प्रत्येक बेरोजगार तरुणाला दरमहा ४ हजार रुपये, महिलांना २,५०० रुपये, वृद्धांना ४,००० रुपये दरमहा पेन्शन आणि शेतक-यांना वर्षाला १५ हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. तेलंगणातील जनतेला काँग्रेसने दिलेल्या हमीभावाबाबत रेवंत रेड्डी म्हणाले होते, कल्याणकारी मॉडेल आणि विकास मॉडेल हे काँग्रेस सरकारचे दोन डोळे आहेत. सक्षम लोकांना संधी देणे, जे अवलंबून आहेत त्यांना पाठिंबा देणे हे आमचे धोरण आहे. आता दिलेली आश्वासने पूर्ण करतानाच या राज्याला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्याचे मोठे आव्हान रेड्डींपुढे आहे. काँग्रेसचे नवे सरकार भ्रष्टाचारमुक्त सरकार कसे चालवते, हीही मोठी लिटमस टेस्ट आहे. रेवंत रेड्डी हे काँग्रेसमधील कनिष्ठ नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री करण्यास काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी विरोध केला होता. ही पार्श्वभूमी लक्षात घेता रेवंत रेड्डी पक्षाच्या नेत्यांना कितपत सोबत घेतात हे येत्या काळात पाहावे लागेल.

-राजीव मुळ्ये,
ज्येष्ठ पत्रकार

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR