पुणे : पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी ही पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. मागील काही वर्षांपासून शहरात गुन्ह्यांचं प्रमाण झपाट्याने वाढलं असून, भरदिवसा रस्त्यावर होणारे हल्ले, खून आणि दहशतीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अशातच आता दत्तवाडी परिसरात कोयता गँगने एका तरुणावर भररस्त्यात हल्ला केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुण्यात सुरू असलेल्या या कोयता गँगच्या दहशतीला लगाम घालण्यासाठी पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. तीन ते चार जणांनी मिळून एका तरूणावर कोयता घेऊन हल्ला केला. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील दत्तवाडी परिसरातील भररस्त्यात तीन ते चार जणांनी एका तरुणाच्या मागे कोयत्यासह इतर धारदार हत्यारे घेऊन धावत होते.
टोळक्यापासून वाचण्यासाठी तो तरुण जीवाच्या आकांताने वाट दिसेल तिकडे धावत होता. मात्र रस्त्यावरच्या वळणावर त्याचा तोल गेला आणि तो काही क्षणांसाठी खाली कोसळला. तितक्यात पाठीमागून हातात धारदार कोयता घेऊन आलेल्या एकाने त्याच्यावर वार केला. त्यापाठोपाठ टोळीतील इतर तरुणही आले आणि त्यांनीही त्या तरुणावर हल्ला चढवला. हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यावेळी दुचाकीवरून त्या तरूणाचा पाठलाग करणारा तरूण त्याच्या इतर साथीदारांना अरे धर, धर त्याला, पकड त्याला असं मोठ्याने ओरडत असल्याचंही दिसून येतं आहे. दत्तवाडीमध्ये पूर्ववैमस्यातून तीन ते चार जणांनी हा हल्ला केला. हातात कोयता घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.