नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाला होता. यामुळे भारत सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा कोणत्याही तिस-या देशातून येणा-या सर्व वस्तूंच्या आयात आणि ट्रान्सशिपमेंटवर तात्काळ बंदी घातली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक आर्थिक आणि राजनैतिक पावले उचलली आहेत, यात व्यापार बंदीचा समावेश आहे.
आता पाकिस्तान युक्ती वापरून एखाद्या देशामार्फत भारतात माल पाठवण्याचा प्रयत्न करू शकतो, असे दिसत आहे. यामुळे आता भारत सरकारने पाकिस्तानशी संबंधित वस्तूंवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणा-या महसूल गुप्तचर संचालनालयाने पाकिस्तानमधून येणा-या आणि संयुक्त अरब अमिराती सारख्या तिस-या देशांमधून भारतात पोहोचणा-या वस्तूंवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.
२ मे रोजी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पाकिस्तानमधून येणा-या सर्व वस्तूंच्या आयात आणि वाहतुकीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी केली. यानंतर सीमाशुल्क विभागाने कडक देखरेख सुरू केली आहे.
पाकिस्तानातून युएई सारख्या तिस-या देशांमधून येणा-या वस्तू ओळखणे सोपे नाही कारण या वस्तू ‘रूल ऑफ ओरिजिन सर्टिफिकेट’ सोबत येतात. पण अधिका-यांचे म्हणणे आहे की लेबल्स आणि पॅकेजिंगची बारकाईने तपासणी केल्यास खरा स्रोत उघड होतो. पाकिस्तानी खजूर आणि सुकामेवा यूएईमार्गे भारतात येत असल्याचा संशय आहे आणि हा मुद्दा अमिराती सरकारसमोर उपस्थित करण्यात आला आहे.