पाक गुप्तचर एजंटाशी संपर्क, संवेदनशील माहिती दिली
हिस्सार : वृत्तसंस्था
हरियाणाच्या हिस्सारमधून ज्योती मल्होत्रा नावाच्या यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा ज्योती मल्होत्रावर आरोप आहे. ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानच्या हाय कमिशनमध्ये कार्यरत असलेल्या दानिश नावाच्या अधिका-यांच्या संपर्कात होती. दानिशने ज्योतीला पाकिस्तानातही पाठवले होते. पाकिस्तानात जाऊन तिने गुप्त माहिती पुरवल्याचे उघड झाले. दरम्यान, आतापर्यंत पंजाब आणि हरियाणातून ६ पाकिस्तानी हेरांना अटक करण्यात आली आहे.
ज्योती मल्होत्राच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरुन एक मोठी माहिती समोर आली. पहलगाम दहशतवादी हल्ला व्हायच्या एक महिना आधी ज्योती श्रीनगर आणि पहलगाममध्ये गेली होती. त्यानंतर मार्च महिन्यात ती पाकिस्तानात गेली होती. २०२३ साली ती पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयामध्ये गेली होती. पाकिस्तानला जाण्यासाठी तिला व्हिसाची गरज होती. त्या ठिकाणी दानिश या अधिका-याशी ओळख झाली आणि नंतर त्यांचा मोबाईलवर संपर्क वाढला.
ज्योतीच्या चौकशीतून असे दिसून आले आहे की, ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती. ज्योतीने संशयास्पद कारवाया करून आणि शत्रू देश पाकिस्तानच्या एका नागरिकासोबत भारतीय गुप्तचर माहितीची देवाणघेवाण करून भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता धोक्यात आणण्याचा गुन्हा केला आहे. त्यामुळे त्याला भारत सरकारने हेरगिरीच्या आरोपाखाली पर्सोन-नॉन-ग्राटा घोषित केले आहे.
आयएसआयच्या
अधिका-यांना भेटली
दानिश या अधिका-याशी संपर्क वाढल्यानंतर ज्योती दोनदा पाकिस्तानला गेली आणि दानिशच्या सल्ल्यानुसार तिथे अली अहवानला भेटली. अली अहवानने पाकिस्तानात त्याच्या राहण्याची आणि प्रवासाची व्यवस्था केली. अली अहवानने ज्योतीची ओळख पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर अधिका-यांशी करून दिली. या काळात ती शाकीर आणि राणा शाहबाज नावाच्या दोन लोकांनाही भेटली. कोणालाही संशय येऊ नये, म्हणून तिने शाकीरचा मोबाईल नंबर जाट रंधावा या नावाने सेव्ह केला होता.
दानिशशी संपर्कात राहून
देशविरोधी माहिती दिली
भारतात परतल्यानंतर ज्योती स्नॅपचॅट, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या लोकांशी संपर्कात राहिली आणि देशविरोधी माहिती देऊ लागली. या काळात ती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश यांच्या सतत संपर्कात होती. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात असल्याचे समोर आले.