34.6 C
Latur
Sunday, May 18, 2025
Homeसोलापूरसोलापुरात टॉवेल कारखान्याला भीषण आग; ३ ठार

सोलापुरात टॉवेल कारखान्याला भीषण आग; ३ ठार

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

सोलापूर : सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसीतील सेंट्रल टेक्स्टाईल कंपनी या टॉवेल कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. एमआयडीसीतील सेंट्रल टेक्सटाइल मिल या कारखान्यात पहाटे साडेचार वाजताच्या दरम्यान लागलेल्या या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आणखीही काही लोक आतमध्ये असण्याची शक्यता असून प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आणखी चार ते पाच कामगार अडकल्याचे समजते. संबंधित टेक्स्टाईलचा मालक तिथेच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास टॉवेल कारखान्यात धुराचे लोट बाहेर पडू लागल्यानंतर एमआयडीसी परिसरात मोठा गोंधळ उडाला.

परिसरातील काही लोकांनी १०८ या क्रमांकावर फोन करत दुर्घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुंभारी सब सेंटर, मार्डी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय या ठिकाणाहून शासकीय रुग्णवाहिका रवाना झाल्या. एमआयडीसीतील कारखान्यात लागलेल्या आगीची माहिती मिळताच पहाटेपासून या भागामध्ये पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, अग्निशामक दल यांचे आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

अग्निशमनची १० वाहने आगेवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पहाटे तीन ते पावणेचारच्या दरम्यान आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेचे चीफ फायर ऑफिसर राकेश साळुंखे व एक फायर कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळवताना अंशत: भाजल्याचे कळत आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे, आगीचे कारण अजून पर्यंत समजले नाही. ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांनी दिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR