बीड : परळी तालुक्यातील लिंबोटा गावातील तरुण शिवराज दिवटे याला सप्ताहात झालेल्या किरकोळ वादावरून १९ ते २० तरुणांनी काठी,बेल्ट आणि रॉडने मारहाण केली. या प्रकरणामध्ये मराठा संघटना आक्रमक झाल्या असून त्यांनी सोमवार दि. १९ मे रोजी परळी आणि बीड बंदची हाक दिली आहे.
शिवराजला मारहाण करणा-या सात जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा आणि मारहाणीमध्ये सहभागी असलेल्या इतरांना अटक करा यासाठी लिंबोटा गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. त्यांनी बीड-परळी मार्गावर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत मागण्या मान्य मान्य होणार नाहीत तोपर्यंत मागे हटणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
मनोज जरांगे हे आज बीडच्या दौ-यावर आहेत. ते देखील रुग्णालयात जाऊन शिवराज दिवटेची भेट घेणार आहेत. दरम्यान, शिवराजला मारहाण करणा-या सचिन मुंडे, ऋषिकेश गिरी, रोहन वाघुळकर, समाधान मुंडे, आदित्य गित्ते यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींवर कठोर कारवाई करा
व्हीडीओ आहेत फोटो आहेत. आरोपी हे त्यांचे समर्थ आहेत असे म्हणत वाल्मिक कराड यांचे नाव न घेता सुरेश धस यांनी निशाना साधला. तसेच आरोपींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी देखील धस यांनी केली आहे. दरम्यान ते आज आंबेजोगाईला जात शिवराजची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
जातीय रंग नको
बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कावत यांनी आवाहन केले आहे की, या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करू नका. २० जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यामध्ये विविध जातीचे आरोपी आहेत.एकाच जातीचे नाहीत. तत्कालीन कारणामुळे वाद झाला होता. जातीय रंग देऊ नये आणि सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट करू नये.