पुणे : प्रतिनिधी
पुरंदर विमानतळाच्या प्रस्तावित प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली असून, हा बागायती भाग वाचवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा निर्णय केंद्र सरकारच्या हातात आहे. मात्र माझा प्रयत्न राहील की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन हा बागायती भाग वाचवता येईल का, याबाबत चर्चा करावी, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, केंद्र सरकारने पुरंदर परिसराची निवड विमानतळासाठी केलेली दिसते. पण ज्या गावात हे विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव आहे, त्या ठिकाणी माझ्या कार्यकाळात एक विशेष सिंचन योजना राबवली होती. त्यामुळे तो संपूर्ण भाग बागायती झाला आहे. परिणामी, स्थानिक ग्रामस्थांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. अशी प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाला स्थानिक पातळीवर मोठा विरोध होत आहे. ३ मे रोजी ड्रोन सर्वेक्षणाच्या दरम्यान हिंसक घटना घडल्या. या झडपांमध्ये २५ हून अधिक पोलिस कर्मचारी तसेच काही ग्रामस्थ जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी थेट शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यालयात जाऊन आपली व्यथा मांडली. भेटीदरम्यान शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी ग्रामसभा घेऊन जमिनी न देण्याचे ठराव केले आहेत. ड्रोन सर्व्हे आणि मोजणी प्रक्रियेदरम्यान पोलिसांशी संघर्ष झाला, ज्यात दोन्ही बाजूंना जखमी झाले. शेतक-यांनी त्यांच्या शेतीच्या जमिनींच्या मोबदल्यात चार ते पाच पट अधिक भरपाईची मागणी केली आहे. राज्य सरकारने त्यांना मोबदल्याचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.