नाशिक : प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे सुकामेव्याच्या दरात वाढ झाली. अफगाणिस्तानातून होणारी आवक थांबल्याने दर १० ते २० टक्क्यांनी वाढले. अटारी-वाघा सीमा बंद असल्याने सुकामेव्याचे ट्रक अडकले. त्यामुळे स्थानिक बाजारात काजू, बदाम, मनुका, अंजीर यांचे दर वाढले आहेत.
दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणाव वाढला. याचा थेट परिणाम उद्योग आणि व्यापारावर झाला. भारतात ६० ते ७० टक्के सुकामेवा अफगाणिस्तानातून पाकिस्तानमार्गे आयात होतो. मात्र, युद्धजन्य परिस्थितीमुळे अटारी-वाघा सीमेवरील व्यापार बंद झाला होता. परिणामी, पाकिस्तानमार्गे देणारे सुकामेव्याचे ट्रक अफगाणिस्तानातच अडकले. यामुळे स्थानिक बाजारपेठेत सुकामेव्याचे दर वाढले.
भारत-पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे अफगाणिस्तानातून आवक विस्कळीत झाल्याने गेल्या काही दिवसांत सुकामेवा १० ते २० टक्क्यांनी महागला आहे. प्रतिकिलो १०० ते ४०० रुपयांपर्यंत दरवाढ झाल्याचे दिसून येते.
शिवाय, अफगाणिस्तानातील आयात दुबईमार्गे करावी लागली, ज्यामुळे वाहतूक खर्चातही वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी भारताने अटारी-वाघा सीमा अफगाणिस्तान व्यापारासाठी पुन्हा खुली केली आहे. त्यामुळे दर कमी होण्याची शक्यता आहे.
उत्पादनातही घट
भारतात दरवर्षी अफगाणिस्तानमधून सुमारे २० हजार टन सुकामेवा आयात होतो, ज्यात बदाम, मनुके, जर्दाळू, अक्रोड आणि पिस्ता यांचा समावेश आहे. मात्र, गेल्या वर्षी या सर्वच सुकामेव्याच्या उत्पादनात घट झाली. याचाही दरवाढीवर परिणाम झाला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर दरही कमी होण्याची शक्यता आहे, असे व्यावसायिक, निरज भंडारी यांनी सांगितले.