28.8 C
Latur
Tuesday, May 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यभरातील अनेक एसटी चालकांना दंड

राज्यभरातील अनेक एसटी चालकांना दंड

वेग मर्यादेची अट शिथिल करण्याची मागणी

नागपूर : प्रतिनिधी
राज्यभरात ओव्हर स्पीडबद्दल एसटीच्या चालकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादेची अट शिथिल करण्याची मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने केली आहे.

एसटी बस हे प्रवासी वाहतूक करणारे वाहन असून कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी बसेस ८० वेग मर्यादेवर लॉक केलेल्या आहेत. एसटीची सुटण्याची व पोचण्याची वेळ ठरवून दिलेली असते. कितीही वाहतूक कोंडी असली तरीही प्रवाशांना ठरवून देण्यात आलेल्या वेळेत उचित स्थळी पोहोचवायचे असते. काही प्रवाशांना पुढचा प्रवास करायचा असतो. अशा वेळी विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांच्या विनंतीवरून रस्त्यावरची स्थिती बघून लेन कटिंग करून पुढे जावे लागते. कधी कधी रुग्ण प्रवाशांना तसेच रात्रीच्या वेळी महिला प्रवाशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून उचित स्थळी पोहोचवायचे असते.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेग मर्यादा घालून देण्याचा सरकारचा नियम योग्य असला, तरी एकंदर सेवेचा विचार करून एसटीला विशिष्ट परिस्थितीत वेग मर्यादेत शिथिलता देण्यात यावी, या विषयावर आरटीओ व एसटीचे व्यवस्थापन यांच्यात चर्चा करावी.

त्याचप्रमाणे चालकांच्या पगारातून अशी वसुली करताना त्यांच्याही आर्थिक स्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात आला पाहिजे, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.
कसा आकारला जातो दंड
वेग मर्यादा उल्लंघन – ४००० रुपये
लेन कटिंग – १००० रुपये
सिग्नल जम्प – ५०० रुपये
गर्दीच्या ठिकाणी गाडी थांबवणे – १००० ते १५०० रुपये
थांबा नसताना गाडी थांबवल्यास – १००० ते १५०० रुपये

दरम्यान, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांना वचक बसवण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्या कॅमे-यातून राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस देखील सुटलेल्या नाहीत. त्यामुळे एसटी चालकानेही नियम मोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. वेगमर्यादा न पाळणा-या चालकांना दंड आकारला जात असल्याने सर्व चालकांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने सर्व चालकांना दिल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR