28.7 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeराष्ट्रीयविद्युतीकरण व दुहेरीकरणानंतरही गैरसोयी वाढल्या

विद्युतीकरण व दुहेरीकरणानंतरही गैरसोयी वाढल्या

सोलापूर : रेल्वेचे विद्युतीकरण व लोहमार्गाच्या दुहेरीकरणानंतर सोलापूर विभागात रेल्वे गाड्यांची संख्या वाढून प्रवाशांना चांगल्या सोयी मिळण्याऐवजी गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने रेल्वेकडून अपेक्षाभंग झाल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. प्रवाशांची फरपट थांबविण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटना रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने सोलापूर शहर आणि ग्रामीण विकासाला खीळ बसण्यास कारणीभूत ठरत आहे.

ब्रिटिश काळापासून धावणाऱ्या मुंबई-चेन्नई आणि चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस या दोन्ही रेल्वे गाड्या सोलापूर विभागातील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीच्या होत्या. सोलापूर शहर आणि ग्रामीण विकासामध्ये या दोन्ही गाड्या योगदान देत होत्या. गाडी क्रमांक ०१०२७ मुंबई-चेन्नई मेल एक्स्प्रेस पूर्वी पूर्वी दौंड येथून पहाटे पाच वाजता सोलापूरकडे मार्गस्थ होत असे. या गाडीला भिगवण, जेऊर, केम, कुडूवाडी, माढा, मोहोळला थांबा होता. सकाळी ९.३० ला सोलापूर स्थानकात या गाडीचे आगमन होत असे. त्यानंतर चेन्नईकडे मार्गस्थ होताना या गाडीला होटगी, अक्कलकोट स्टेशन, दुधनी, गाणगापूर, कलबुरगीला थांबा होता.

दौंडवरून सोलापूरला आणि सोलापूरहून कलबुरगीकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूच्या प्रवाशांसाठी ही गाडी सोयीची होती. परतीच्या प्रवासात म्हणजे मुंबईला जाताना चेन्नई-मुंबई ही गाडी दुपारी तीन वाजता वाडी स्थानकातून सोलापूरकडे मार्गस्थ होत होती. कलबुरगी, दुधनी, अक्कलकोट, होटगी स्टेशन येथे थांबा घेऊन सायंकाळी सहा वाजता सोलापूर स्थानकात दाखल होत होती. सकाळी मुंबई-चेन्नई मेलने सोलापुरात आलेले प्रवासी आपले कामकाज आटोपून चेन्नई-मुंबई मेल एक्स्प्रेसने रात्री १० वाजता दौंडला पोहोचत होते. शाळा, कॉलेज, नोकरदार, व्यापारी, श्रमिक आदी प्रवाशांसाठी ही गाडी लाभदायक असताना कोरोना महामारीच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने अचानक या गाडीच्या वेळेत बदल केला. तेव्हापासून प्रवाशांची सुरू झालेली गैरसोय थांबायला तयार नाही.

मुंबई-चेन्नई मेल एक्स्प्रेसला सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा देऊन (गाडी क्रमांक २२६१५७) ही गाडी अधिक गतिमान केली आहे. सध्या दौंड स्थानकातून ही गाडी पहाटे ४.२० वाजता सुटते आणि सोलापूर जिल्ह्यात जेऊर, कुर्डुवाडी येथे थांबा घेऊन सकाळी ६.५० ला सोलापूर स्थानकात पोहोचते. चेन्नईकडे जाताना या गाडीला होटगी स्टेशनचा थांबा नाकारून अक्कलकोट, दुधनी, गाणगापूर या तीनच ठिकाणी थांबा देण्यात आला आहे. शिवाय नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी यांच्यासाठी ही गाडी गैरसोयीची ठरत आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांची वेळ पूर्वीप्रमाणेच असावी यासाठी सोलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील हे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. परंतु त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सोलापूर मार्गे मुंबई आणि दक्षिणेकडे जाणाऱ्या बहुतांश गाड्यांना सोलापूर विभागामध्ये कमी थांबे दिले आहेत. आधुनिकीकरणामध्ये रेल्वेचे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण झाले. त्यामुळे गाड्यांची संख्या वाढून अधिकाधिक थांब्यावर रेल्वे गाड्यांना थांबा देऊन प्रवाशांना सेवा मिळेल ही अपेक्षा होती. परंतु थांबेच नसतील तर सोलापूर शहर आणि जिल्ह्याचा विकास कसा होईल, असा प्रश्न रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रा. संजय पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR