23.5 C
Latur
Wednesday, May 21, 2025
Homeमहाराष्ट्रछत्तीसगडमधील चकमकीत २७ नक्षलवादी ठार

छत्तीसगडमधील चकमकीत २७ नक्षलवादी ठार

कोटीचे बक्षीस असणा-या वासवराजूचाही खात्मा

नारायणपूर : छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. या चकमकीदरम्यान, सुरक्षा दलांनी २७ नक्षलवाद्यांना ठार केले आहे. ज्यामध्ये वसवराजूचा समावेश होता, ज्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. या चकमकीत एक जवान देखील शहीद झाला तर एक जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुझमद परिसरात सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. नारायणपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रभात कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील अबुझमद भागातील माड विभागात नक्षलवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) नारायणपूर, डीआरजी दंतेवाडा, डीआरजी बिजापूर आणि डीआरजी कोंडागाव यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाईसाठी रवाना करण्यात आले.

छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा म्हणाले, आमचा एक सैनिक जखमी झाला आहे, तो धोक्याबाहेर आहे. सैनिकांनी चमत्कार केला आहे. २६ हून अधिक नक्षलवादी मारले गेले आहेत. अंतिम शोध मोहीम सुरू आहे गृहमंत्री विजय शर्मा म्हणाले, ‘मोठे नक्षलवादी मारले जाण्याची शक्यता आहे. हे नारायणपूर, सुकमा आणि विजापूरचे क्षेत्र आहे, जिथे डीआरजी सैनिकांनी धाडस दाखवले आहे. हे एक मोठे यश आहे. मृतदेह आणि शस्त्रास्त्रांची माहिती लवकरच दिली जाईल.’’

पुढे ते म्हणाले, आम्हाला नक्षलवाद्यांना सांगायचे आहे की केंद्र आणि राज्य सरकार एक गोळीही चालवू इच्छित नाही. अमित शहा यांनी बस्तरच्या भेटीदरम्यान सांगितले की, मी नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात परत येण्याची आणि चर्चा करण्याची विनंती करतो. मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनीही असेच आवाहन केले आहे. केंद्र सरकारने देशाला नक्षलमुक्त करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत दिली आहे. हे लक्षात घेता, नक्षलवाद्यांवर सतत कारवाई केली जात आहे. अलीकडेच, छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील करेगुट्टालूच्या डोंगरात नक्षलवाद्यांवर २१ दिवस कारवाई करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR