मुंबई : प्रतिनिधी
काँग्रेसच्या तिरंगा यात्रेवर टीका करणा-या भाजपच्या नेत्यांना रेल्वेच्या तिकिटांवरील ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो कशासाठी अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. यावरून राजकारण कोण करते हे सांगण्याची गरज नाही, असाही टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला आहे. त्यावरून आता भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. दोन्ही पक्षांच्या वतीने यात्रा काढल्या जात आहेत. या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीका-टिप्पणी करीत आहेत.
सैनिकांच्या सन्मानार्थ आणि राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचा दिवस सद्भावना दिवस जाहीर करण्यात आला. हे निमित्त साधून काँग्रेसच्या वतीने आज तिरंगा यात्रा काढली जात आहे. सर्व धर्मांना समान अधिकार आणि वागणूक मिळावी आणि समाजात सद्भावना निर्माण व्हावी यासाठी काँग्रेसची यात्रा आहे असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.
यापूर्वीसुद्धा भारताने युद्ध जिंकले आहे. १९६२, १९६५ आणि १९७१च्या युद्धात भारताने मोठा विजय मिळवला होता. चीनच्या युद्धावरून जवाहरलाल नेहरू यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यावेळी विशेष अधिवेशन बोलावून लोकांना उत्तरे देण्यात आली होती. मात्र मोदींच्या काळात उत्तरे दिली जात नाहीत.
या देशात लोकशाही आहे. जनतेला आणि विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. राहुल गांधींनी प्रश्न विचारले तर सैन्याचा अपमान केला जात असल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातो. पुलवामात अडीचशे किलो आरडीएक्स कुठून आले, कोणी आणले, आणणारे कोण होते याचा शोध अद्यापही घेतला जात नाही याकडेही वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले.
पहलगाममध्ये चार अतिरेक्यांचे स्केच दाखवल्या गेले. ते कुठे लपले आहेत, सीमेपार लढाई केली, मात्र भारतात लपलेले अतिरेकी का हाती लागत नाहीत, त्यांचा शोध का घेतला जात नाही, असा सवाल वडेट्टीवारांनी उपस्थित केला. आम्ही याची विचारणा केली. सैनिकांचा अपमान करता तुम्ही देशद्रोही असे आरोप केले जातात. देशाचा अवमान करणारे कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे, असेही ते म्हणाले.