नांदेड : प्रतिनिधी
मान्सुनपूर्व सुरू झालेल्या अवकाळी पावसाने नांदेड जिल्ह्यात कहर सुरू केला आहे. मागील २० दिवसांत झालेल्या अवकाळी पावसात पडून जिल्ह्यात ५ जणांचा मृत्यू झाला. सोबत ३६ जनावरे दगावली तर जिल्ह्यातील २९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
यंदा मे महिन्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. दि. १ ते २० मे या कालावधीत प्रादेशिक हवामान केंद्राकडून अनेकवेळा यलो ऍलर्ट घोषित झाला होता. तर मागील दोन दिवसांत ऑरेंट ऍलर्ट जाहीर झाला होता. या २० दिवसांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने तडाखा दिला.
वादळी वा-यासह विजेचा कडकडाट आणि पाऊस यामुळे जिवितहानी व पशुधन दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. यात आत्तापर्यत वीज पडून ५ जणांचा मृत्यू झाला. यात लोह्यातील २, नायगाव १, कंधार – १ व हिमायतनगरातील एकाचा समावेश आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले.
यासोबत लहान – मोठे अशी एकूण ३६ जनावरे दगावली आहेत. यासोबत अनेक घरांची पडझड झाली आहे तर या अवकाळी पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील २९६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. यात १७१ हेक्टरवरील फळपिकांचा तर १२५ हेक्टरवरील बागायती पिकांचा समावेश आहे. मागील २० दिवसांच्या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडला आहे. अजूनही पुढील काही दिवस हवामान केंद्राने धोकादायक असल्याचे भाकित वर्तविले आहे.