बारामती : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनलने दणदणीत विजय मिळवला. या पॅनलने सर्व २१ पैकी २१ जागा जिंकत विरोधी श्री छत्रपती पॅनलचा पराभव केला. सर्व विजयी उमेदवारांनी पाच ते साडेपाच हजार मतांच्या आघाडीने विजय मिळवला.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची व रंगतदार ठरली. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात होती. बारामती व इंदापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येणा-या या कारखान्याची सध्या परिस्थिती अडचणीची असून, त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री पवार यांनी माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्याशी मतभेद बाजूला ठेवत एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी सकाळी नऊ वाजता बारामती शहरातील प्रशासकीय भवन इमारतीत मतमोजणीला सुरुवात झाली. मतदान बॅलेट पेपरवर झाल्यामुळे मतमोजणीत मोठा वेळ लागला. मतपत्रिकांची जुळवाजुळव करून मोजणी केल्यामुळे प्रक्रिया दुस-या दिवशी पहाटे चार वाजेपर्यंत चालू होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निवडणुकीचा कल स्पष्ट होऊ लागला आणि जय भवानी माता पॅनलने मोठ्या मताधिक्याने आघाडी घेतली. पहाटे साडेपाच वाजता अंतिम निकाल जाहीर झाला. त्यानुसार पॅनलचे सर्वच उमेदवार पाच ते साडेपाच हजार मतांच्या फरकाने विजयी ठरले.